मुंबई :मुंबई शहर आणि उपनगरातील झोपडपट्टींमधील शाळांमध्ये बायोटॉयलेट्स उभारण्यासाठी म्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळाने सर्वेक्षण सुरू केले आहे. ५00 शाळांचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यानंतर तातडीने बायोटॉयलेट्स बांधण्यात येणार आहेत. मुंबईमधील शाळांमध्ये स्वच्छतागृह आणि पिण्याचे स्वच्छ पाणी देण्याच्या योजनेचा शुभारंभ तात्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाला होता. त्यानुसार धारावीमधील गणेश विद्यामंदिर शाळेत पहिल्या बायोटॉयलेटचे उद्घाटनही चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले होते. या योजनेसाठी शासनाने सुमारे ३६ कोटींचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून झोपडपट्टीतील ५00हून अधिक शाळांमध्ये बायोटॉयलेट्स उभारण्यात येणार आहेत. या योजनेद्वारे पारंपरिक पद्धतीचे आणि प्री फॅब्रिकेशन टॉयलेट देण्यात येणार आहेत. शिक्षण निरीक्षक कार्यालयाकडून म्हाडाला ५00 शाळांची यादी पाठविण्यात आली आहे. या यादीतील शाळांचे सर्वेक्षण झोपडपट्टी सुधार मंडळाकडून सुरू झाले आहे. (प्रतिनिधी)
पाचशे शाळांमध्ये बायोटॉयलेट्स
By admin | Updated: February 23, 2015 00:59 IST