पनवेल : पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या आॅटो रिक्षा परवान्यांच्या वाटपाला सोमवारी सुरुवात झाली. विजेत्या परवानाधारकांना शासनाने मराठी तोंडी परीक्षा अनिवार्य केल्याने ही तोंडी परीक्षा आज घेण्यात आली. परिवहन अधिकारी व मराठी पत्रकार या दोघांच्या माध्यमातून ही परीक्षा घेण्यात आली. ५ मार्चपर्यंत ही तोंडी परीक्षा परिवहन कार्यालय पनवेल याठिकाणी पार पडणार आहे. पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने पनवेल परिसरातील १११६ आॅटो रिक्षा परवान्यांचे वाटप केले जाणार आहे. टप्प्याटप्प्याने तोंडी परीक्षा घेतली जाणार आहे. ज्या विजेत्याला मराठी वाचता येत नसेल त्याचा परवाना यावेळी रद्द केला जाणार आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना परिवहन अधिकारी आनंद पाटील यांनी सांगितले की, मराठीचे पुरेसे ज्ञान आहे की नाही याची माहिती मुलाखतीद्वारे घेवूनच विजेत्यांना परवान्यांचे इरादापत्र देणार आहोत. याठिकाणी होत असलेल्या परीक्षांसाठी एकूण १० अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून ८ कर्मचारी याठिकाणी कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी ठेवण्यात आले आहेत. ४ पोलीस देखील याठिकाणी बंदोबस्तासाठी ठेवण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.आणखी पाच दिवस ही परीक्षा होणार आहे. (प्रतिनिधी)
आॅटो रिक्षा परवान्यासाठी चाचणी परीक्षांना सुरुवात
By admin | Updated: March 1, 2016 02:49 IST