शहरातील २३ विसर्जन तलावांवर रविवारी सकाळपासून गणेशभक्तांनी बाप्पाला निरोप देण्यासाठी गर्दी करण्यास सुरवात केली होती. बाप्पाला निरोप देण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सातारा, पुणे व इतर ठिकाणांवरून ढोल पथकांना बोलावले होते. सायंकाळी वाशी, नेरूळ,कोपरखैरणे परिसरातील रस्ते गणेशभक्तांनी फुलून गेले होते. बाप्पाला निरोप देण्यासाठी हजारो नागरिक उपस्थित होते. पहाटे चारपर्यंत ७,५०८ घरगुती व ५१९ सार्वजनिक गणेशमूर्तींना निरोप देण्यात आला. वाशीतील शिवाजी चौकामध्ये गणरायांवर महापालिकेच्यावतीने पुष्पवृष्टी करण्यात येत होती. वाशीमध्ये शिवसेनेचे विठ्ठल मोरे, भारतीय जनता पक्ष व इतर सामाजिक संस्थांनी गणेशभक्तांसाठी चहा, अल्पोपहाराची सोय केली होती. शहरातील सर्व तलावांवर विशेष खबरदारी घेण्यात येत होती. अग्निशमन दलाचे जवान व पोहता येणाऱ्या स्वयंसेवकांना तैनात करण्यात आले होते. -स्वयंसेवकांविषयी नाराजीशहरातील काही विसर्जन तलावांवर स्वयंसेवक गणरायाचे विसर्जन करण्यासाठी भाविकांकडून पैशांची मागणी करत होते. ३०० ते ५०० रुपयांची मागणी केली जात होती. मोठ्या मंडळांकडून ५ हजार रुपये मागितले जात होते. याविषयी नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. अनेक स्वयंसेवक चांगले काम करतात परंतु ठरावीक पैशांसाठी अडवणूक करणाऱ्यांमुळे सर्वांची प्रतिमा खराब होत असल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली. ---खाडीत बंदीवाशी खाडीमध्ये यावर्षी मानखुर्दमधील गणरायांना विसर्जन करण्यास मनाई करण्यात आली. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला. वाशी गावातील फक्त तीन गणेशमूर्तींचेच खाडीत विसर्जन करण्यात आले. -----नेरूळमध्ये एका गणेशमूर्तीचे वजन जास्त असल्यामुळे तराफ्यावर ठेवता येत नव्हती. यामुळे जवळपास तीन तास विसर्जन थांबवावे लागले होते. अखेर क्रेन मागवून गणेशमूर्तीला तराफ्यावर ठेवण्यात आले. पोलिसांनी शहरात कडक बंदोबस्त ठेवला होता. यामुळे निर्विघ्नपणे विसर्जन पार पडले. महापौर सुधाकर सोनावणे, आमदार मंदा म्हात्रे, माजी खासदार संजीव नाईक व इतर पदाधिकाऱ्यांनीही विसर्जन परिसरात मध्यरात्रीपर्यंत उपस्थिती दर्शविली होती.----------वडाळे तलाव , आदई तलाव, कोळीवाडा, गाढी नदीच्या विविध ठिकाणच्या पात्रात, कोपरा तलाव आदी ठिकाणी मोठ्या संख्येत विसर्जनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. पनवेलमध्ये १९७१, नवीन पनवेल २८८९, खांदेश्वर १७८९, कळंबोली ९२०, कामोठे २१०७, खारघर ४३०१ आदी घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तालुक्यातील ग्रामीण भागात देखील ३ हजारांपेक्षा जास्त मूर्ती यावेळी विसर्जित करण्यात आल्या. ---------खारघरमध्ये डाँ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्यावतीने निर्माल्यापासून कपोस्ट खत निर्मितीचा उपक्रम राबविला. शहरातील ३ विसर्जन ठिकाणांवर १२९ स्वयंसेवकांची नेमणूक करुन साडेपाच टन निर्माल्य गोळा करण्यात आले. या निर्माल्यावर प्रक्रिया करुन निर्माल्यापासून तयार होणारे कपोस्ट खत खारघरमध्ये प्रतिष्ठानने केलेल्या वृक्षांच्या संवर्धनासाठी वापरले जाणार आहे.
भावपूर्ण वातावरणात बाप्पाला निरोप
By admin | Updated: September 29, 2015 00:41 IST