कळंबोली : सिडको वसाहतीत बॅनर आणि होर्डिंग्जबाबत प्राधिकरणाचे कोणतेही धोरण नसल्याने कुठेही, कधीही आणि कोणीही बॅनर लावून शहर विद्रूप करीत आहे. नवीन पनवेल येथील एचडीएफसी आणि आदई सर्कल तर याकरिता आंदण दिले की काय, असा प्रश्न पडला आहे. हे दोनही सर्कल बॅनरमुळे झाकून गेले आहेत. सिडकोकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.नाके, चौकात त्याचबरोबर रस्त्याच्या कडेला लावण्यात येणाऱ्या बेकायदा बॅनर, होर्डिंग्ज कटआऊटवर कारवाई करण्याचे आदेश यापूर्वीच न्यायालयाने प्रशासनाला दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था व पोलिसांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सिडकोने एक वेळा फलक आणि बॅनर काढले त्यानंतर कोणतीही मोहीम हाती घेतली नाही. त्यामुळे जिकडे तिकडे बॅनरच दिसत आहेत. आदई आणि एचडीएफसी सर्कल तर बॅनर होर्डिंग्जने लुप्त झाला आहे. राजकीय पक्षांचे बॅनर लावण्याकरिता या ठिकाणी स्पर्धाच लागली असल्याचे भासते, यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. (वार्ताहर)
नवीन पनवेलला बॅनर्सचा विळखा
By admin | Updated: May 23, 2016 03:18 IST