बदलापूर : बदलापूरमध्ये नाट्यगृह व्हावे, ही नागरिकांची मागणी राज्य शासनाने वर्षभरापूर्वीच मंजूर केली. केवळ आश्वासन न देता थेट या नाट्यगृहासाठी निधीचा पुरवठाही केला. मात्र पालिका प्रशासन नाट्यगृहाची जागा ताब्यात न घेऊ शकल्याने नाट्यगृहाचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे बदलापूर सांस्कृतिक चळवळीचे महत्त्वाचे केंद्र असले तरी पालिका मात्र अरसिक असल्याचे उघड झाले आहे. बदलापुरात येथील कात्रप विद्यालयाच्या बाजूला नाट्यगृहाचे आरक्षण विकास आराखड्यामध्ये मंजूर आहे. ठाणे, डोंबिवलीनंतर सांस्कृतिक शहराचा वारसा बदलापूरला लाभला. या शहरासाठी एक सुसज्ज असे नाट्यगृह असावे ही मागणी आमदार किसन कथोरे यांच्यासह पालिकेच्या सर्वच नवरसेवकांनी शासनाकडे केली. राज्य शासनाने पालिकेला त्यासाठी १४ कोटी १४ लाख रुपये निधी मिळाल्यावर नाट्यगृहाचे काम पूर्ण होण्यास अडचणी येणार नाही, असे वाटत होते. मात्र या प्रकल्पात पालिका प्रशासनाचा ढिसाळ कारभार आड आला आहे. निधी आला पण जागा नाही अशी अवस्था नाट्यगृहाची झाली आहे. नाट्यगृहाची जागा ताब्यात घेण्यास पालिका प्रशासन कोणतेही ठोस निर्णय घेत नसल्याने हा प्रकल्प पुढे सरकेलेला नाही. मुख्यमंत्र्यांनी २९ मार्च २०१५ रोजी राज्य सरकारच्या वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून नाटयगृह बांधण्यासाठी १४ कोटी १४ लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुपूर्द करण्यास मंजुरी दिली. या निधीचा विनियोग करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली. या कामाची अंमलबजावणी, काम वेळेत व गुणवत्तेनुसार पूर्ण करण्याचे सर्वाधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. सविस्तर अंदाजपत्रक, सक्षम प्राधिकरणाची प्राप्त करून घेऊन समितीकडून प्रशासकीय मान्यता घेतल्यानंतर या कामासाठी लागणारा निधी जिल्हाधिकारी संबंधित यंत्रणेकडे सुपूर्द करणार आहेत. म्हणजेच नाट्यगृहसाठी देण्यात आलेल्या निधीचा विनियोग करण्याचे सर्व अधिकारही या समितीला देण्यात आले आहेत. नाट्यगृहासाठी व प्रशासकीय इमारतीसाठी कुळगाव बदलापूर नगर परिषदेला वैशिष्टयपूर्ण अनुदानातून मिळालेला निधीचा वापर वर्षभरात करणे बंधनकारक आहे. त्यासाठी फार फार तर आणखी वर्षभराची मुदतवाढ मिळू शकते. होणारा विलंब हा नाट्यगृहाच्या प्रकल्पाला बाधा निर्माण करीत आहे. (प्रतिनिधी)
बदलापूर पालिका झाली अरसिक !
By admin | Updated: March 7, 2016 02:19 IST