नवी मुंबई : एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने अनेकांची फसवणूक करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाने अटक केली आहे. त्यांच्याकडून १९ लाख रु पये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अटक केलेले पाचही जण उच्च शिक्षित असून त्यापैकी एकाला यापूर्वी अशाच गुन्ह्यात शिक्षा झालेली आहे. सानपाडा येथील द एस्पिरेशन नावाच्या कार्यालयातून हा कट रचला गेला होता. काही तरु णांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे कोपरखैरणे येथे भाड्याने घर घेतले होते. यानंतर त्यांनी दलालाच्या मदतीने सानपाडा रेल्वेस्थानकात भाड्याने कार्यालय घेतले होते. त्याठिकाणी काही तरु णींना नोकरीला ठेवून त्यांच्यामार्फत वैद्यकीय प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना फोनवरून संपर्क साधला जात होता. यानुसार कार्यालयात संपर्क साधणाऱ्या पालकांना पुणेतील काशीबाई नवले, नेरु ळचे तेरणा कॉलेज व इंदोर येथील अरविंद मेडिकल कॉलेज येथे एमबीबीएसकरिता प्रवेश मिळवून देण्याची हमी दिली जात होती. तर इच्छुक असणाऱ्या पालकांकडून अॅडमिशनकरिता चेक, डीडी किंवा आरटीजीएसद्वारे रक्कम स्वीकारली जात होती. त्यांच्या या आमिषाला बळी पडून अनेकांनी पैसे दिले होते. मात्र सप्टेंबर २०१६ मध्ये कार्यालय बंद करून त्यांनी पळ काढल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सानपाडा पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात मोठे रॅकेट सक्रि य असल्याच्या शक्यतेमुळे गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाने तपासाला सुरवात केली होती. त्याकरिता उपायुक्त दिलीप सावंत, सहाय्यक आयुक्त नितीन कौसडीकर यांच्या नेतृत्वाखाली कक्ष एकचे वरिष्ठ निरीक्षक शिवाजी आवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अजित गोंधळी, हवालदार अजय मोरे यांचे तपासपथक तयार करण्यात आले होते. त्यांनी राजस्थानमधून पाच जणांच्या टोळीला अटक केली आहे. अभिषेक आशुतोष झा, सौरभ शीतलप्रसाद सिंग, गौरव शीतलप्रसाद सिंग, सुशीलकुमार सुहासचंद्र वर्मा व हेमंद्र भद्र सरकार अशी त्यांची नावे आहेत. गौरव हा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचे सहाय्यक आयुक्त नितीन कौसडीकर यांनी सांगितले. त्याने यापूर्वी मध्यप्रदेश येथे अभियांत्रिकी शिक्षण घेत असताना अशा मॅनेजमेंट कोट्यातून काहींना प्रवेश मिळवून दिला होता. परंतु यामध्ये घोटाळा झाल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन अटक झाली होती. तर यामध्ये बदनामी झाल्यामुळे वडिलांनी त्याला घरातून बाहेर काढले होते. अखेर शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर त्याने झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी व बारचे छंद जोपासण्याकरिता त्यांनी ही शक्कल लढवली होती. यानुसार त्यांनी १७ जणांना तीन कोटी रु पयांचा गंडा घातला होता. परंतु ही रक्कम ज्या ज्या बँक खात्यात वाटली, त्या खात्यांची कसून चौकशी केली असता, या टोळीचा भांडाफोड झाल्याचे कौसडीकर यांनी सांगितले. त्यांच्याकडून १९ लाख रुपये किमतीचाच मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक केलेले सर्वजण उच्च शिक्षित आहेत.
वैद्यकीय प्रवेशाचे आमिष दाखविणारी टोळी अटकेत
By admin | Updated: February 23, 2017 06:39 IST