नवी मुंबई : व्यापाऱ्यांनी संप मागे घेताच एपीएमसीमध्ये आवक प्रचंड वाढली आहे. ५५० वाहनांमधून भाजीपाला विक्रीसाठी आल्याने मार्केटमध्ये चक्काजामची स्थिती झाली होती. परंतु खरेदीदारांनी अडत देण्यास नकार दिल्यामुळे दोन तास व्यवहार ठप्प होते. व्यापाऱ्यांनी समजावून सांगितल्यानंतर व्यवहार पूर्ववत झाले. एपीएमसीत रात्री २ वाजेपासून पहाटेपर्यंत तब्बल ५५० वाहनांची आवक झाली. तीन दिवस विक्रीसाठी पुरेसा भाजीपाला मिळाला नसल्याने किरकोळ विक्रेत्यांनीही खरेदीसाठी मोठी गर्दी होती. परंतु माल खरेदी केल्यानंतर व्यापाऱ्यांनी अडत कमिशन खरेदीदारांच्या बिलामध्ये लावण्यास सुरवात करताच खरेदीदारांनी विरोध केला. त्यामुळे मार्केटमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती. अखेर व्यापारी व प्रशासनाने कायद्याप्रमाणे अडत खरेदीदारांकडून घ्यावी लागणार असल्याचे समजावून सांगितल्यानंतर व्यवहार पूर्ववत सुरू झाले. फळ मार्केटमध्ये व्यापाऱ्यांनी ग्राहकांना अडतविषयीची भूमिका पहिलेच पटवून दिल्याने तेथील व्यवहार निर्विघ्नपणे पार पडले. (प्रतिनिधी)
संप मिटताच एपीएमसीत विक्रमी आवक
By admin | Updated: July 15, 2016 01:37 IST