नवी मुंबई : कामगारांचे प्रश्न सोडवण्याऐवजी टोळ्यांमधील वाद वाढतच चालल्यामुळे संतप्त माथाडी कामगारांनी माथाडी भवनवर धडक दिली. या वेळी मसाला मार्केटमध्ये जमलेल्या कामगारांनी थेट एका नेत्याविरोधात घोषणाबाजी केल्याने युनियनमधील दोन गट उघड झाले आहेत; परंतु शुक्रवारी होणाऱ्या बैठकीपूर्वी वाद टाळण्याच्या उद्देशाने आमदार शशिकांत शिंदे यांनी कामगारांची समजूत काढत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.कामाच्या हक्कावरून दोन टोळ्यांमधील वाद बुधवारी पुन्हा एकदा पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला. एक टोळी काम करत असलेल्या ठिकाणी दुसऱ्या टोळीने जबरदस्ती कामाला सुरुवात केल्यामुळे त्यांच्यात वाद झाला होता. या वेळी माथाडीनेते आमदार नरेंद्र पाटील यांनी एपीएमसी पोलीस ठाण्यात धाव घेत अधिकृत टोळीचे काम बळकावणाऱ्या टोळीवर कारवाईची मागणी केली होती; परंतु पोलिसांनी दोन्ही टोळींच्या कामगारांना समज देऊन प्रकरण मिटवले होते. याच प्रकरणाचे पडसाद गुरुवारी पुन्हा मार्केट आवारात उमटले. ज्या टोळीवर कारवाईची मागणी केली जात होती, त्या टोळीसह इतर काही टोळींच्या कामगारांनी धान्य मार्केट व मसाला मार्केटमध्ये जमाव जमवला होता. त्यांनी आमदार नरेंद्र पाटील यांच्याविरोधात थेट घोषणाबाजी करत माथाडी भवनवर धडक दिली. या वेळी त्या ठिकाणी युनियनचे कार्याध्यक्ष, आमदार शशिकांत शिंदे उपस्थित होते. संतप्त कामगारांनी त्यांची भेट घेऊन वाराईच्या कामावरून टोळ्यांमध्ये होत असलेल्या वादावर तोडगा काढण्याची मागणी केली. तर यावर शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत तोडगा काढला जाणार असल्याचे आश्वासन देत शिंदे यांनी कामगारांची समजूत काढली. मात्र, या प्रकारावरून महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट अॅण्ड जनरल कामगार युनियनमध्ये पडत चाललेली फूट उघड झाली आहे. यापूर्वी युनियनने ज्या टोळीला एका गाडीतून दुसऱ्या गाडीत माल वाहन्याचे (पलटी) काही प्रमाणात काम दिले होते. तीच टोळी युनियनच्या निर्णयाविरोधात जाऊन इतरही टोळींच्या कामावर हक्क दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचाही कामगारांचा आरोप आहे. (प्रतिनिधी)बुधवारी घडलेल्या प्रकारावरून संतप्त कामगारांनी माथाडी भवनमध्ये धाव घेतली. वाद चिघळू नये, याकरिता त्यांची समजूत काढण्यात आली आहे. तर एका टोळीच्या कामावर दुसऱ्या टोळ्या दावा करत असल्याचीही कामगारांची तक्रार आहे. शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत योग्य निर्णय घेतला जाईल.- शशिकांत शिंदे, आमदार, युनियन कार्याध्यक्ष
संतप्त कामगारांची माथाडी भवनवर धडक
By admin | Updated: March 10, 2017 04:28 IST