पनवेल : नगरपालिकेने अनधिकृत फलक आणि बॅनर्समुक्त शहर असा संकल्प नवीन वर्षात केला आहे. त्यानुसार शनिवारी पालिकेने अशा फलकांवर कारवाई करून जप्त केले. त्यामध्ये मोठमोठे हॉटेल, बारच्या फलकांचा समावेश आहे. सोमवारी ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्स, कटआऊट, फलकांचे पेव फुटले आहे. मनाला वाटेल त्या ठिकाणी अशा प्रकारे फलक लावले जातात. राजकीय पक्षांमध्येसुद्धा याबाबत तीव्र स्पर्धा लागली आहे. पनवेल नगरपालिकेने याबाबत धोरण ठरवले आहे. याकरिता निविदा पद्धतीने खास एजन्सी नियुक्त करण्यात आली आहे. संबंधित एजन्सीकरिता काही पॉइंट फिक्स करून देण्यात आले आहेत. त्या ठिकाणी बॅनर्स, फलक लावण्याकरिता ही एजन्सी रक्कम वसूल करते. शहरात मोठ्या प्रमाणात बेकायदा फलक लावण्यात येतात. त्यामध्ये व्यावसायिक, त्याचबरोबर हॉटेलवाल्यांची संख्या अधिक आहे. नियमानुसार फलक लावण्याकरिता पैसे मोजावे लागत असल्याने फुकटे मिळेल तिथे फलक लावतात. त्यामुळे शहर विद्रूप होत आहे.उच्च न्यायालयाने अनधिकृत फलक, होर्डिंग्जवर कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी यासंदर्भात बैठक बोलावली होती. त्यानुसार शनिवारी पनवेल नगरपालिकेने यासंदर्भात विशेष मोहीम हाती घेतली. गार्डन हॉटेल ते पनवेल बसस्थानक या परिसरातील फलकांवर कारवाई केली. महामार्गालगत असलेल्या बार, हॉटेल, त्याचबरोबर इतर व्यावसायिकांचे पत्र्याचे फलक कटरच्या साह्याने कापण्यात आले. शहर विद्रुप करणाऱ्या सर्व अनधिकृत बॅनर्स व होर्डिंग्जवर सुद्धा कारवाई करण्यात आली. (वार्ताहर) उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आम्ही ही मोहीम हाती घेतली आहे. या आगोदर राजकीय पक्ष, व्यावसायिकांना अंतिम नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. सोमवारपासून ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येईल. कारवाईच्या आड येणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील.- मंगेश चितळे, मुख्याधिकारी, पनवेल नगरपालिका
पनवेलमध्ये अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई
By admin | Updated: January 3, 2016 00:32 IST