उरण : राज्यातील लाखो मच्छीमारांचा विरोध असलेली आणि मच्छीमारांच्या वाढत्या विरोधामुळे मत्स्यव्यवसाय विभागालाही सातत्याने डोकेदुखी ठरू पाहणारी रात्रीच्या अंधारात एलईडी लाइटवर मासेमारी करणाऱ्या आणखी एका नौकेवर रायगड मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी भर समुद्रात कारवाई करण्यात यश मिळविले आहे. अलिबाग बंदरातून ही नौका मासेमारीस जाताना मुद्देमालासह पकडण्यात आली आहे.रायगड मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रभारी सहायक आयुक्त रत्नाकर राजम यांच्या नेतृत्वाखाली आणि परवाना अधिकारी गावडे (श्रीवर्धन) आणि स्वप्निल दाभाणे (उरण) यांच्या पथकाने ३१ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास ही कारवाई केली. अलिबाग पोलीस मुख्यालयातील पोलीस कॉन्स्टेबल ओ. एस. सोडेकर यांच्या मदतीने मत्स्यव्यवसाय विभागाची नौका मत्स्यप्रबोधिनीने भर समुद्रात पाठलाग करून कारवाई केली. कारवाई करण्यात आलेल्या कैवल्यमूर्ती या मच्छीमार नौकेवरील पाण्यातील व पाण्याबाहेरील लाखो रुपये किमतीचे एलईडी लाइट्स आणि इतर सामान ताब्यात घेण्यात आले आहे. कारवाईनंतर मासेमारी नौका अलिबाग बंदरात अवरूद्द करून ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती प्रभारी सहायक आयुक्त रत्नाकर राजम यांनी दिली.
एलईडी मासेमारी नौकेवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 22:44 IST