नवी मुंबई : महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या धडक कारवाई मोहिमेंतर्गत मंगळवारी सीबीडी बेलापूर विभागातील अनधिकृत फेरीवाले, विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. सीबीडी सेक्टर ८ ए आणि बी, सेक्टर १, २, ३, ४, ५, ६ आदी परिसरात कारवाई करण्यात आली. महानगरपालिकेच्या धडक कारवाई मोहिमेंतर्गत दुपारी दोन वाजेनंतर या परिसरातील अनधिकृत फेरीवाले, विक्रेत्यांना हटविण्यात आले. गेल्या काही वर्षांपासून अनधिकृत फेरीवाले, विक्रेत्यांनी सीबीडी बेलापूर परिसरातील रस्त्यांवरील जागा अडविली होती. या परिसरातील पादचारी तसेच प्रवाशांना फेरीवाल्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. मात्र मनपाच्या कारवाईनंतर बेलापूर विभागातील पदपथ मोकळे करण्यात आले असून नागरिकांना दिलासा देण्यात आला आहे. रस्त्यावर बस्तान मांडून बसलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासंदर्भात अनेकदा महापालिकेकडे तक्रार करण्यात आली होती, मात्र तेवढ्यापुरते कारवाई करून पुन्हा तेच चित्र पहायला मिळत होते. महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अतिक्रमण हटविण्याची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. अनधिकृत फेरीवाले, विक्रेत्यांमुळे नवी मुंबई शहराचे विद्रूपीकरण झाले होते, मात्र आता या शहराच्या सौंदर्यात भर पडण्याची चिन्हे दिसत आहेत.
सीबीडीत फेरीवाल्यांवर कारवाई
By admin | Updated: June 15, 2016 01:39 IST