नवी मुंबई : गणेशोत्सव काळात शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये, याकरिता पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यानुसार पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या १,२३३ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.शहरात सध्या मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होत आहे. हा उत्सव शांततेत पार पडावा याकरिता नवी मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे. सध्या देशावर दहशतवादाचे सावट असल्याने उत्सवकाळात त्यांच्याकडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे अशा समाजकंटकांचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त लावलेला आहे. शहरातील मुख्य ठिकाणी, प्रसिद्ध मंडळे यासह विसर्जन स्थळ व मार्गावरदेखील दिवस-रात्र पोलिसांचा बंदोबस्त आहे. यादरम्यादन गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांच्याही मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. अशा स्थानिक गुंडांकडून धार्मिक तिढा निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. यामुळे गणेशोत्सव काळात त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईचा निर्णय पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांनी घेतला आहे. त्यानुसार पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील १,२३३ गुन्हेगारांवर विविध कलमांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये परिमंडळ १ मधील ८१७ तर परिमंडळ २ मधील ४१६ गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींचा समावेश आहे. त्याशिवाय परिमंडळ १ मधील १३ गुन्हेगारांना हद्दपार करण्याचा निर्णय झाला आहे. त्यापैकी ५ जणांना हद्दपारीची नोटीसा बजावल्या आहेत. तर ४ जन कारागृहात असून, उर्वरित ४ जन फरार असल्याने त्यांचा शोध सुरू असल्याचे उपायुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले. सुखविंदरसिंग निर्मलसिंग (२७), राकेश शेलार (२२), इरशाद इक्बाल ऊर्फ बादल खान (२३) व प्रभू कांबळे (३५) अशी फरार गुन्हेगारांची नावे आहेत. परिमंडळ २ मधील ७ जणांवर गणेशोत्सवकाळासाठी हद्दपारीची कारवाई केल्याचे उपायुक्त विश्वास पांढरे यांनी सांगितले. तर उत्सवकाळात अवैध दारूविक्रीला पूर्णपणे आळा बसावा, याकरिता दारूबंदीच्या कलम ९३ अंतर्गत ८ जणांवर कारवाई केल्याचेही त्यांनी सांगितले.गणेशोत्सव काळात परिमंडळ १ मध्ये सुमारे १२००, तर परिमंडळ २ मध्ये ७०० पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर कार्यरत आहेत. त्यांच्याकडून शहरातील प्रत्येक गैर हालचालींवर बारकाईने नजर ठेवली जात आहे. दहशतीसाठी वाहणांचा वापर होऊ नये याकरिता ठिकठिकाणी वाहतूक पोलिसांनी नाकाबंदी करून वाहणांची झडाझडती सुरू आहे. विसर्जन स्थळांवर रात्रीच्या वेळी मोठ्या संख्येने गणेशभक्तांची गर्दी असते. अशा गर्दीच्या ठिकाणी वावरणाऱ्या गुन्हेगारांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी साध्या गणवेशातील पोलीस कार्यरत ठेवण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)
पोलिसांची १२३३ जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2015 00:08 IST