वैभव गायकर, पनवेलनवी मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पनवेल तालुक्यातील कोरळवाडी येथील आदिवासी बांधव अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. रोजगारासाठी दररोज ३ ते ४ किलोमीटरची पायपीट करून उदरनिर्वाहाचे साधन शोधणाऱ्या या आदिवासींची नेतेमंडळींकडून केवळ आश्वासनांवर बोळवण करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया स्थानिक देतात. वाडीत जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे ५ वीनंतर शिक्षणासाठी मुलांना दररोज जंगलातून ६ किमीची पायपीट करावी लागते. त्यामुळे वाडीतील अनेक विद्यार्थी पुढील शिक्षणापासून वंचित आहेत. सरकारने याबाबत लक्ष घालून वाडीसाठी रस्ता तयार करून देण्याची मागणी येथील राम वाघे यांनी केली आहे.आदिवासी पाड्यासाठी वारंवार रस्त्याची मागणी करूनही अद्याप हक्काचा मार्ग मिळालेला नाही. कधी पनवेल वनविभागाची तर कधी पेण वनविभागाची मंजुरी नसल्याचे सांगून प्रशासनाकडून टोलवाटोलवी होत असल्याची प्रतिक्र या वाडीतील माजी ग्रामपंचायत सदस्य बापू पवार यांनी दिली. वाडीला पाणीपुरवठा करतो, असे दर्शवून एका कंपनीने सिडकोकडून पाणीपुरवठ्यात वाढ करून घेतली. मात्र प्रत्यक्षात वाडीपर्यंत पाणीच पोहोचले नाही. इतकेच नव्हे तर आठवड्यातून एक दिवस येणारे पाणीही बंद झाले आहे. त्यामुळे बोअरवेलवर अथवा तिथे पाणी न आल्यास ३ किमीची पायपीट करावी लागत असल्याचे येथील तुळसाबाई राम वाघे यांनी सांगितले.
रस्त्याअभावी आदिवासी वाडीतील मुले शिक्षणापासून वंचित
By admin | Updated: October 31, 2015 00:16 IST