- प्राची सोनवणे, नवी मुंबई विविध कलाकुसरीच्या वस्तू, हस्तकला तसेच हातमागाच्या वस्तू याला जोड म्हणून पारंपरिक, सांस्कृतिक तसेच कार्यक्रमांची मांदियाळी असलेल्या अर्बन हाटमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये ८००० कारागिरांना आपल्या कलाकुसरीच्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची संधी मिळाली आहे. जानेवारी २०१० पासून सुरु झालेल्या या अर्बन हाटमध्ये आतापर्यंत ९१ महोत्सवांचे आयोजन करण्यात आले असून लाखो ग्राहकांनी या मेळाव्याला भेट दिली आहे. एकाच छताखाली कला, खाद्यसंस्कृती आणि सांस्कृतिक उपक्र म या ठिकाणी अनुभवता येत असल्याने ग्राहकांनी अर्बन हाटला चांगला प्रतिसाद दिला. महिला बचत गट, लघुउद्योग यांच्या माध्यमातून तयार केलेल्या कलात्मक वस्तू, सांस्कृतिक उपक्र म, भारतभरातील हस्तकला व कलाकुसरीच्या वस्तूंना अर्बन हाटमध्ये हक्काचे प्रदर्शन व विक्र ी केंद्र लाभले आहे. विविध राज्यांतील वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृतीचा आस्वाद हा देखील अर्बन हाटमधील मेळ्यातील महत्त्वपूर्ण घटक असून या ठिकाणी असलेल्या फूड कोर्टमध्ये खवय्यांना विविध प्रांतातील चविष्ट पदार्थ चाखण्याची संधी मिळते. भारतातील लोककलेला आणि उदयोन्मुख कलांविषयी जनजागृती आणि प्रोत्साहन देणे हे अर्बन हाटच्या निर्मितीमागील उद्दिष्ट आहे. कला-प्रात्यक्षिके तसेच कलावंत आणि सहभागीजनांना कच्चा माल-सामग्री, माहिती आणि आवश्यक ते संपर्क उपलब्ध करून देणे, तसेच हस्तकला आणि क्र ॉस डीसीप्लिनरी एक्स्चेंजच्या माध्यमातून त्यांना मदत केली जात असल्याची महिती सिडको अर्बन हाटचे व्यवस्थापक के. एस. व्ही. नायर यांनी दिली. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा, आंध्र प्रदेश, झारखंड, बंगाल, उत्तर प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, छत्तीसगड, बंगाल आदी राज्यांतील कलाकार व कारागिरांच्या कलाकृतींचा यात समावेश असून आतापर्यंत २३ राज्यातील कारागिरांनी यामध्ये सहभाग घेतल्याचे नायर यांनी सांगितले. या उपक्र माद्वारे केवळ लोककला- हस्तकलेच्या क्षेत्राला मदत होत नसून, कला आणि कला उत्पादनांच्या व्यवसायाकरिता कलावंत व खरेदीदार यांच्यात समन्वय साधला जात आहे. सिडको अर्बन हाटमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या विविध प्रदर्शनांमुळे नवी मुंबईतील नागरिकांना संपूर्ण वर्षभर विविध प्रकारच्या हस्तकला आणि मानवनिर्मित वस्तूंचा आविष्कार आणि समृद्धता पाहण्याची संधी मिळते. २०१५ मध्ये जानेवारी ते डिसेंबरपर्यंत २९९ दिवसांमध्ये २० महोत्सवांचे आयोजन करण्यात आले असून २०१६ साली ३०० हून अधिक महोत्सवांचे आयोजन करुन प्रतिदिन हाट बनविण्याचा सकारात्मक प्रयत्न केला जाणार आहे. अर्बन हाटमध्ये १०० स्टॉल्सची जागा असून या ठिकाणी कारागिरांना आपल्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री करण्याची संधी उपलब्ध करुन दिली जाते. अर्बन हाटमध्ये लवकरच नेचर ट्रेलअर्बन हाट परिसराला लाभलेले निसर्ग सौंदर्य, विविध प्रजातीचे वृक्ष, बटरफ्लाय पार्क यामुळे या ठिकाणी निसर्ग परीक्षणाची एक उत्तम संधी देण्याकरिता नेचर ट्रेल हा उपक्रम राबविला जात आहे. या माध्यमातून निसर्गप्रेमी, शालेय विद्यार्थी, तरुण तसेच वयोवृध्द नागरिकांना निसर्गाचा अभ्यास करण्याची संधी दिली जात आहे. या ठिकाणी असलेल्या वृक्ष प्रजाती तसेच फुलपाखरांच्या विविध प्रजातींविषयी माहिती देण्याकरिता पर्यावरण तज्ज्ञ, पक्षीतज्ज्ञ याठिकाणी उपलब्ध करुन दिले जात असून निसर्गावर प्रेम करण्याची भावना मानवाच्या मनात निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबविला जात असल्याची माहिती व्यवस्थापकांनी दिली.
पाच वर्षांत ८००० कारागिरांना संधी
By admin | Updated: February 9, 2016 02:32 IST