सिकंदर अनवारे, दासगांवशेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या महाड तालुक्यातील गोठे दासगाव असा ५० गाव-वाडीवस्तीतील नागरिकांचा होडी प्रवास बंद झाला आहे. कारण मार्चअखेर या सावित्री नदीतील होडीने वाहतूक करण्याचा ठेका संपला आहे.महाड पंचायत समिती बांधकाम विभागाकडून नवीन ठेका होणे अपेक्षित आहे. मात्र दीड महिला उलटून गेला तरी पुढील ठेक्यासाठी हालचाल न केल्याने मागील ठेकेदाराने आपल्या होड्या बंद केल्या आहेत. याचाच फटका या ५० गावांतील नागरिकांना बसत असून खाडीपट्ट्यातील संतप्त नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. मात्र यामार्गे दर दिवशी शेकडो नागरिक होडीने दोन्ही बाजूने प्रवास करीत असतात. दासगांव हे शेकडो वर्षांपासून बंदर आहे. पूर्वीच्या काळात याच बंदराचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात येत होता. या ठिकाणी भारताच्या कानाकोपऱ्यातून कोकणात जाणाऱ्या नागरिकांची वर्दळ होती. कोकणात जाणाऱ्या लोकांना दासगांव बंदरच एकमेव ठिकाण होते. त्यावेळी खाडीपट्ट्यातील तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड विभागातील नागरिकांसाठी बाजार खरेदी व मुंबई कोकणात जाणे व इतर ठिकाणी जाण्यासाठी जवळपास शंभरहून अधिक गावांना गोळे ते दासगाव असा सावित्री नदीमधून होडीचा प्रवास करून एकमेव मार्ग होता. मात्र आंबेत आणि टोल या दोन ठिकाणी पूल झाल्यामुळे काही गावांना या दोन पुलांचा वापर झाला. आजही ५० हून अधिक खाडी पट्ट्यातील गाव त्या ठिकाणचे शेकडो नागरिक गोठे ते दासगांव सावित्री नदीमार्गे होडीने सतत प्रवास करतात. मात्र या सावित्री नदीमध्ये दर तीन वर्षांनी महाड पंचायत समितीमार्फत होडी प्रवास वाहतूकचा ठेका लिलाव करून देण्यात येतो. मार्च २०१६ मध्ये या ठेक्याची मुदत संपली आहे. महाड पंचायत समितीच्या बांधकाम विभागाकडून पुढील ठेका काढण्यात न आल्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून सावित्री नदीतील होडी मार्ग बंद पडला आहे. दासगांवमध्ये सुक्या मासळीचा आठवडा बाजार भरतो. खाडीपट्टा विभागातील हजारोंच्या संख्येने नागरिक महिला व पुरुष वर्ग या बाजारात खरेदीसाठी मोठ्या संख्येने येतात. मात्र होडी मार्ग बंद असल्याने या ठिकाणी असणाऱ्या रेल्वेपुलावरून चालत धोका पत्करून यावे लागत आहे. यात त्यांचा प्रवासासाठी अतिरिक्त खर्च आणि वेळही वाया जातो. खाडीपट्ट्यातील जास्त मोठ्या प्रमाणावर नागरिकांची खरेदी डॉक्टर, बँक व्यवहार मोठ्या प्रमाणावर दासगांव या ठिकाणीच आहेत. त्यामुळे जवळचा होडी मार्ग बंद झाल्याने खाडीपट्ट्यातील नागरिक महाड पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या कामकाजावर संतप्त झाले आहेत. दासगांवच्या आठवडा बाजारामध्ये कडधान्य मोठ्या प्रमाणावर विक्री केले जाते. सध्या मूग, मटकी, तूर, पावटा, वाल अशी अनेक कडधान्ये खाडीपट्ट्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आणतात. बंद होडीचा फटका यांना बसला असून वाहतूक वाढली. खर्च वाढल्याने नफ्यात घट झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
५० गाव-वाड्याचा होडी प्रवास बंद
By admin | Updated: May 15, 2016 03:58 IST