नवी मुंबई : थर्टीफर्स्टच्या दिवशी मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या ३९६ जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. नववर्षाच्या जल्लोषाला गालबोट लागू नये, यासाठी लावलेल्या बंदोबस्तादरम्यान पोलिसांनी ही कारवाई केली आहे. त्यामध्ये परिमंडळ १ मध्ये १८६, तर परिमंडळ २ मध्ये २१० कारवाया पोलिसांनी केल्या.नववर्षाचे स्वागत जल्लोषात साजरे करण्यासाठी हॉटेल व बारसाठी पहाटे पाचपर्यंतची मुदत देण्यात आलेली होती. मात्र जल्लोष साजरा होत असताना कोणताही गैरप्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावलेला होता. यानुसार परिमंडळ १ व २ मध्ये सुमारे दीड हजारहून अधिक पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर होते. आवश्यक ठिकाणी शहर पोलीस व वाहतूक पोलीस यांनी संयुक्त नाकाबंदीदेखील केलेली होती. शहरात अवैध दारूसाठ्याची वाहतूक होऊ नये, गुन्हेगारांचा वावर होऊ नये, यावर त्यांच्याकडून नजर ठेवली जात होती. याकरिता संशयित वाहनांची झडाझडती घेतली जात होती. तर दारू पिऊन वाहन चालवल्याने होणारे अपघात टाळण्यासाठी तळीराम चालकांवर कारवाई केली जात होती. त्यानुसार पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ३९६ जणांवर ड्रंक अँड ड्राइव्हच्या कारवाया करण्यात आल्या. परिमंडळ १ मध्ये १८६ तर परिमंडळ २ मध्ये २१० कारवार्इंचा समावेश आहे. शहरात कोणताही गैरप्रकार घडू नये, याकरिता पोलीस उपायुक्त दिलीप सावंत, सुरेश मेंगडे, अरविंद साळवे, विश्वास पांढरे, शहाजी उमाप हेदेखिल रात्री उशिरापर्यंत शहरात गस्तीवर होते. तर सर्व साहाय्यक आयुक्त, वरिष्ठ निरीक्षक व नाकाबंदीचे कर्मचारी यांनाही ते सतर्क करीत होते. शहरात झालेल्या एकूण कारवाया गतवर्षीच्या तुलनेत जास्त आहेत. नववर्षाच्या पहाटेपर्यंत बंदोबस्त सुरूच होता. (प्रतिनिधी)पनवेलमध्ये शेकडो तळीरामांवर कारवाईपनवेल : नववर्षाचे स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी गुरुवारी सर्वत्र जल्लोषाचे वातावरण होते. तालुक्यातील हॉटेल्स, ढाब्यावर मोठी गर्दी होती . पोलिसांनी देखील प्रत्येक ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवून अनुचित घटना रोखण्यासाठी कंबर कसली होती. मद्यप्राशन करून गाडी चालविण्यास बंदी असताना शेकडो तळीरामांनी ३१ डिसेंबरला शेकडो तळीरामावर कारवाई करण्यात आली. खारघर वाहतूक शाखेंतर्गत २५, तळोजा २० , कळंबोली ५६ , पनवेल ४३ नवीन पनवेल ४० आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ड्रंक अँड ड्राइव्हच्या शहरात ३९६ कारवाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2016 08:34 IST