कर्जत : कर्जत तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींच्या 59 जागांसाठी 23 नोव्हेंबरला निवडणूक होत आहे. सार्वत्रिक निवडणुकीसाठी 59 जागांसाठी दाखल नामांकन अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल 82 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता 48 जागांसाठी 110 उमेदवार अंतिम रिंगणात राहिले आहेत. दरम्यान, चार ग्रामपंचायतीमधील अकरा जागा तेथे एकमेव उमेदवार राहिल्याने त्या 11 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत.
कर्जत तालुक्यातील नेरळ, उमरोली, वाकस, तिवरे आणि वरई तर्फे नीड या पाच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 210 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. त्यातील सात नामांकन अर्ज छाननी प्रक्रि येत बाद ठरले होते. त्यामुळे 203 वैध नामांकन अर्जापैकी आज नामांकन मागे घेण्याच्या दिवशी तब्बल 82 उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज मागे घेऊन माघार घेतली. नेरळ ग्रामपंचायतीमधील 29 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे 17 जागांसाठी आता 56 उमेदवार अंतिम रिंगणात राहिले आहे.
तेरा जागांसाठी निवडणूक होत असलेल्या उमरोली ग्रामपंचायतीमध्ये 23 उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज मागे घेतल्यामुळे आता तेथे 10 जागांसाठी 22 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. तेथील प्रभाग दोनमधील एक आणि प्रभाग पाचमध्ये एकही अर्ज नसल्याने तेथे दोन जागांसाठी मतदान होणार नाही.
उमरोली ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे. नऊ सदस्य निवडीसाठी निवडणूक होत असलेल्या तिवरे ग्रामपंचायतीमध्ये दाखल झालेल्या अर्जापैकी 27 उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज मागे घेतले. तेथील प्रभाग एकमधील दोन जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यात नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव चित्ना जगदीश ठाकरे आणि सर्वसाधारण महिला राखीव जागेवर जना मुकुंद पवार असे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले. तालुक्यातील वाकस ग्रामपंचायतीच्या 11 जागांसाठी दाखल अर्जापैकी 8 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यात प्रभाग एकमध्ये अर्चना राजेंद्र दुर्गे (सर्वसाधारण महिला), कविता सुनील दुर्गे (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला) या तर तीनमध्ये शेवंता हरी मिरकुटे (अनुसूचित जमाती महिला) जागेवर बिनविरोध निवडून आल्या. प्रभाग चारमध्ये अनंत हल्या दळवी (सर्वसाधारण) व जागृती जयदास दळवी ( सर्वसाधारण) हे पाच उमदवार बिनविरोध निवडून आले. याठिकाणी सहा जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात राहिले आहेत.
वरई तर्फे नीड ग्रामपंचायतीमध्ये दाखल 25 पैकी 13 उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे 9 पैकी तब्बल सहा जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत.आता केवल 6 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. येथे प्रभाग दोनमध्ये यशोदा चंदर मोडक (सर्वसाधारण), किशोर गणू मोडक (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), अनिता अनिल धुळे (सर्वसाधारण महिला)हे तीन तसेच प्रभाग तीनमधील करु णा दीपक भुसारी (नागरिकांचा मागास प्रवर्ग), जितेन्द्र रघुनाथ देशमुख (सर्वसाधारण), फशी सखाराम वाघमारे (अनुसूचित जमाती महिला) हे बिनविरोध निवडून आले आहेत.