ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २० - देशभरातील केंद्र सरकारच्या सेवेतील कर्मचा-यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी एक एप्रिलपासून योगासनांचे वर्ग आयोजित करण्यात येणार आहेत. पर्सोनेल व प्रशिक्षण खात्याने शुक्रवारी या संदर्भात आदेश काढला असून रविवार व सुट्टीचे दिवस वगळता अन्य दिवशी हे वर्ग घेण्यात येणार आहेत. यासाठी नोंदणी तसेच शुल्क असणार नाही. देशभरात केंद्र सरकारच्या सेवेत असलेल्या कर्मचा-यांची संख्या ३१ लाख असून त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना या सेवेचा लाभ मिळणार आहे.
पारंपरिक औषधे आणि योगविद्या यांचा प्रसार करण्याची भूमिका केंद्र सरकारने घेतली असून हा याच प्रयत्नाचा भाग आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर योगदिन साजरा करण्यात यावा असे आवाहन संयुक्त राष्ट्रांना केले होते. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी २१ जून हा दिवस योगा डे म्हणून साजरा करण्यात येईल असे जाहीर केले. केंद्र सरकारमधील वरीष्ठ अधिका-यांसाठीही तणावमुक्तीची तंत्रे शिकवणारी दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.