ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १५ - गेल्या शतकात आयआयटीने भारताच्या विकासात योगदान दिले असले तरी आता यंदाचे शतक हे आयटीआयचे असेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. आयटीआयच्या छोट्या छोट्या शाखांमध्ये लोकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण मिळाल्यास रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण होतील असेही त्यांनी स्पष्ट केले.
बुधवारी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पंतप्रधान कौशल्य विकास योजनेचा शुभारंभ झाला. याप्रसंगी मोदींनी अनेक उदाहरण देत कौशल्य विकासाचे महत्त्व पटवून दिले. कौशल्य विकासाचे प्रमाणपत्र हे इंजिनियरच्या प्रमाणपत्राऐवढेच महत्त्वाचे असेल अशी ग्वाही त्यांनी दिली. जगभरातील मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्याची क्षमता फक्त भारतामध्येच असून आपण यासाठी सज्ज राहणे गरजेचे आहे. यासाठीच कौशल्य विकास योजना सुरु केल्याचे मोदींनी सांगितले. कौशल्य विकास योजनेव्दारे तरुणांचा आत्मविश्वास वाढवून देशात नवीन उर्जा करायची आहे असेही त्यांनी नमूद केले.