रियासी (जम्मू) : जम्मू-काश्मीरच्या उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे मार्गावरील चेनाब नदीवर जगातील सर्वांत उंच रेल्वे पूल बांधण्यात येत आहे. २०१९ मध्ये हा रेल्वे पूल बांधून पूर्ण केला जाईल.चेनाब नदीवर बांधण्यात येत असलेला हा ३५९ मीटर उंचीचा आणि शत्रू राष्ट्राच्या सीमेजवळील निर्जन स्थळी बांधण्यात येत असलेला रेल्वे पूल जगप्रसिद्ध आयफेल टॉवरपेक्षा ३५ मीटर जास्त उंच असेल. जगात सध्या फ्रान्समधील टॉम नदीवर बांधण्यात आलेला पूल सर्वांत उंच पूल मानला जातो. या पुलाचे खांब नदीपात्रापासून ३४० मीटर उंचीवर आहेत. चेनाब नदीवर बांधण्यात येत असलेला हा कमानीच्या आकाराचा रेल्वे पूल बक्कल (कत्रा) आणि कौरी (श्रीनगर) या दोन नदीकाठांना जोडणार आहे. ताशी २६६ कि.मी. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचा तडाखा सहन करू शकेल, अशा पद्धतीने या पुलाची रचना करण्यात आली आहे. या रेल्वे पुलाच्या जम्मू ते कत्रा सेक्शनचे बांधकाम पूर्ण झाले आहे आणि हा मार्ग २०१४ मध्येच खुला करण्यात आला आहे. उर्वरित कत्रा-बनिहाल सेक्शनवरील बांधकाम सुरू आहे.वाऱ्याचा वेग तपासण्यासाठी कोकण रेल्वेतर्फे या पुलावर संवेदक (सेन्सर) बसविण्यात येतील. वाऱ्याने ताशी ९० कि.मी.चा वेग घेतला की रेल्वे मार्गावरील सिग्नल आपोआप लाल होतील आणि रेल्वेला पुलावर येण्याआधीच थांबविता येईल. केआरसीएलने आतापर्यंत या प्रकल्पावर २९०० कोटी रुपये खर्च केले आहेत. प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च ६१०० कोटी रुपये आहे, असे गुप्ता म्हणाले. (वृत्तसंस्था)
काश्मिरात तयार होतोय जगातील सर्वात उंच रेल्वे पूल
By admin | Updated: March 23, 2016 03:27 IST