बार्देस : खोब्रावाडा-कळंगुट येथील रस्त्यावर साचणार्या पाण्याचा निचरा करण्यासाठी दगडी भर घालून रस्त्याची उंची वाढविण्यावरून कळंगुटचे आमदार मायकल लोबो व पंचसदस्य जोजेफ सिक्वेरा यांच्यात झालेल्या तिढ्यावर आज सायंकाळी बार्देस तालुका उपजिल्हाधिकारी साबाजी शेट्ये यांच्या कार्यालयात कळंगुट पंचायतचे काही पंचमंडळ व सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते यांच्यासमवेत बैठक घेण्यात आली. त्यावर दोन्ही गटातील लोकांनी आपापल्या मताशी ठाम राहिल्याने उपजिल्हाधिकारी शेट्ये यांनी हे प्रकरण जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपविण्यात येईल असे सांगितले. यावेळी या बैठकीला मामलेदार दशरथ गावस, साहाय्यक मामलेदार एस. शेट्ये, गटविकास अधिकारी दीपक वायंगणकर, कळंगुट पंचायतच्या सरपंच पाशकोला फर्नाडीस, स्थानिक पंच एनी फर्नांडीस, जोझेफ सिक्वेरा, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते ब्रानंद नाईक, जे. ई. फर्नांडीस, बा. सिक्वेरा, कळंगुट पोलीस निरीक्षक राजेशकुमार आदी उपस्थित होते. उपजिल्हाधिकारी शेट्ये यांनी या सर्व अधिकार्यांसमवेत पंचसदस्य आणि अभियंत्याशी चर्चा केली. यावेळी हा तिढा सुटण्याची चिन्हे दिसेनाशी झाली. त्यावेळी उपजिल्हाधिकार्यांनी हे प्रकरण मिटविण्यासाठी आपण जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवून देणार आहे. त्याठिकाणी या रस्त्याबाबत निर्णय लागले. तोपर्यंत या रस्त्याचे बांधकाम स्थगित ठेवण्यास सांगितले. (प्रतिनिधी) फोटो : उपजिल्हाधिकारी कार्यालयात रस्त्याबाबत चर्चा करताना अभियंते व पोलीस निरीक्षक. (प्रकाश धुमाळ) १६०६-एमएपी-१०
खोब्रावाडा-कळंगुट रस्त्यांचा वाद तोडग्याविना
By admin | Updated: June 17, 2014 17:52 IST