नवी दिल्ली : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना इंटर-सर्विस गार्ड आॅफ आॅनर देणाऱ्या पथकाचे नेतृत्व करणाऱ्या विंग कमांडर पूजा ठाकूर यांनी आज रविवारी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले़ एका महिला कमांडरच्या नेतृत्वाखाली एखाद्या देशाच्या अध्यक्षांना गार्ड आॅफ आॅनर देण्याची भारतातील ही पहिलीच वेळ असल्याने यानिमित्ताने एक आगळा वेगळा इतिहास रचला गेला़ अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सन्मानार्थ सलामी दिली जात असताना, इंटर सर्व्हिस गार्ड आॅफ आॅनरचे नेतृत्व करून भारतीय हवाई दलाचे प्रतिनिधित्व करणे माझ्यासाठी गौरवाचा क्षण आहे, अशी प्रतिक्रिया विंग कमांडर पूजा ठाकूर यांनी दिली़ या क्षेत्रात महिला अधिकाऱ्यांसमक्ष असलेल्या अडचणींबाबत विचारले असता, महिला-पुरुष असा कुठलाही भेद नसल्याचे त्यांनी सांगितले़ आम्ही आधी अधिकारी आहोत; नंतर महिला आणि पुरुष़ आम्ही एकसमान आहोत; कारण आम्हाला समान प्रशिक्षण दिले गेले आहे, असे त्या म्हणाल्या़ सन २०००मध्ये भारतीय हवाईदलात सामील झालेल्या पूजा हवाईदलाच्या मुख्यालयात कार्मिक अधिकारी संचालनालयांतर्गत प्रचार शाखा ‘दिशा’मध्ये कार्यरत आहेत़
विंग कमांडर पूजा ठाकूर यांनी रचला इतिहास!
By admin | Updated: January 26, 2015 04:37 IST