ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १७ - पोप राहत असलेल्या व्हॅटिकन सिटीमध्ये ख्रिश्चन हनुमान मंदिर बांधू देतील का असा सवाल उपस्थित करत विहिंपने हरियाणातील चर्चच्या तोडफोडीचे समर्थन केले आहे. ख्रिश्चनांनी धर्मपरिवर्तन थांबवले नाही तर भारतात त्यांच्याविरोधात पुन्हा १८५७ सारखा उठाव होईल असा इशाराच विहिंप नेते सुरेंद्र जैन यांनी दिला आहे.
सोमवारी हरियाणा येथे बांधकाम सुरु असलेल्या चर्चवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करुन चर्चची मोडतोड केली होती. हल्लेखोरांनी चर्चमध्ये हनुमानाची प्रतिमा लावल्याचे वृत्त आहे. यावरुन वाद सुरु असतानाच विश्व हिंदू परिषदेचे सहसचिव सुरेंद्र जैन यांनी हरियाणातील चर्चवरील हल्ल्याचे समर्थन करुन आगीत तेल ओतण्याचेच काम केले. १८५७ मध्ये इंग्रजांविरोधातील उठावाला धार्मिक पार्श्वभूमी होती. आतादेखील ख्रिश्चनांनी धर्मपरिवर्तनाचे उद्योग बंद केले नाही तर १८५७ प्रमाणे त्यांच्याविरोधात पुन्हा सशस्त्र उठाव होईल असे जैन यांनी म्हटले आहे. पश्चिम बंगालमधील ननवरील बलात्कार प्रकरणात हिंदूत्ववाद्यांचा हात नसून ननचे लैंगिक शोषण करण्याची परंपरा ख्रिश्चनांमध्येच आहे असे वादग्रस्त वक्तव्यही त्यांनी केले. ननवरील लैंगिक शोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी पोप आता समलैंगिकांना प्रोत्साहन देत आहे अशी मुक्ताफळेही जैन यांनी उधळली आहेत.
हरियाणातील ज्या गावात चर्चची तोडफोड झाली तिथे एकही ख्रिश्चन नाही. मग तिथे चर्च बांधण्याचा घाट का घातला जात होता. ख्रिश्चनांनी हिंदूंना व्हॅटिकन सिटीमध्ये मंदिर बांधण्याची परवानगी द्यावी त्यानंतर आम्ही ख्रिश्चनांना स्वखर्चाने चर्च बांधून देऊ असेही जैन यांनी म्हटले आहे.