कोल्हापूर : कोल्हापूरच्या नाट्यचळवळीसाठी नवसंजीवनी ठरलेल्या राज्य नाट्य स्पर्धेत यंदा सर्वच संघांनी सर्वोत्तम सादरीकरणावर अधिक लक्ष केंद्रित केल्याने एकाहून एक सरस कलाकृती या रंगमंचावर अवतरत आहेत. एकीकडे नाटकांना प्रेक्षकच येत नाहीत, अशी ओरड सुरू असताना दुसरीकडे तुम्ही सर्वोत्तम देणार असाल तर आम्ही तुमच्यासोबत आहोत, अशी साद देत रसिकांचा उदंड प्रतिसाद या स्पर्धेला लाभत आहे. ‘प्रतिज्ञा नाट्यरंग’च्या प्रशांत जोशी यांच्या प्रयत्नातून तब्बल १० वर्षांनी कोल्हापूरला ‘राज्य नाट्य’चे प्राथमिक केंद्र मिळाले. बरीच वर्षे चळवळीत खंड पडल्याने संहितेपासून ते सादरीकरणापर्यंतच्या पातळीवर मोजके संघ सोडले, तर रसिकांना फार दर्जेदार नाटके पाहता आली नाहीत. अनुभवाने आपण अधिक परिपक्व होतो. यानुसार यंदा राज्य नाट्यमध्ये सादरीकरणाच्या पातळीवर सर्वच संघांनी जय्यत तयारी केल्याचे लक्षात येते. लेखन, दिग्दर्शन, अभिनयाची खोली, प्रसंगानुरूप नेपथ्य आणि सुसंगत संगीत या सर्वच पातळ्यांवर घेतलेली मेहनत आणि त्यामागची भावना मायबाप रसिक प्रेक्षकांच्या नजरेस न आली तर नवलच! नव्या संहितासंहिता ठराविक कालावधीतल्याच हव्यात, ही अट शासनाने शिथिल केल्यानंतर रंगमंचावर पुन्हा जुनी नाटके येत असली तरी यंदा नव्या संहिता मोठ्या प्रमाणात सादर होत आहेत. ‘नटसम्राट’सारख्या जुन्या नाटकांची मोहिनी कायम ठेवतानाच नव्या संहितांमधून आजचे प्रश्न, तरुणाईच्या समस्या, बदलता समाज याचे प्रतिबिंब उमटण्याचे आव्हान लीलया पेलल्याचे दिसते.गर्दी नव्हे... दर्दी !बंद असलेले केशवराव भोसले नाट्यगृह आणि शाहू स्मारक भवनची कमी आसनक्षमता ही मर्यादा यावेळी प्रकर्षाने जाणवते. तीनशे-सव्वातीनशे तिकिटे संपली की हॉल पॅक. असे असले तरी हौशी रंगभूमी चळवळीच्या उत्कर्षाच्या दृष्टीने ही गर्दीदेखील संघाला प्रोत्साहन देणारी ठरली आहे. टाईमपास किंवा बघू या तरी काय आहे, या हेतूने नव्हे तर जाणकार रसिक प्रेक्षक म्हणून नागरिकांची भूमिकाही यात महत्त्वाची ठरली आहे. विनाकारण शेरेबाजी करणे नाही, गोंधळ नाही. उलट भावलेल्या संवादांना, कलाकृतीला मनमुराद दाद देणारा दर्दी प्रेक्षक स्पर्धेत रंगत भरतोय. नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीतनाटक प्रभावशाली व्हावे यासाठी नेपथ्याची आकर्षक आणि कथानुरूप मांडणी आवश्यक ठरते. सुरेख नेपथ्य हेदेखील यंदाचे खास वैशिष्ट्य म्हणावे लागेल. पडदा उघडताच रंगमंचावर सुरेख नेपथ्य दिसले की रसिक टाळ्या वाजवून या कलाकृतीला दाद देतात
कोण म्हणतंय नाटकांना प्रेक्षक मिळत नाही ?
By admin | Updated: November 30, 2014 23:58 IST