नवी दिल्ली : कोणताही ठोस नियम नसला तरी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी सभागृहात एखाद्या सदस्याची विरोधी पक्षनेतेपदी नेमणूक करायला हवी, असे मत लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चटर्जी यांनी व्यक्त केले. चटर्जी यांनी प्रारंभीच स्पष्ट केले की, एखाद्या पक्षाला विरोधी नेतेपदाचा दर्जा देण्यासाठी लोकसभेत त्या पक्षाचे संख्याबळ किमान १० टक्के असणे आवश्यक आहे. सोबतच हा मुद्दा लोकसभा अध्यक्षांच्या विवेकावर सोडून द्यायला हवा, असेही ते म्हणाले. विरोधी पक्षनेतेपदी निवडीसाठी संबंधित पक्षाचे माझ्या माहितीप्रमाणे सभागृहात १० टक्के संख्याबळ असायला हवे. याबाबतचा निर्णय अध्यक्षांच्या विवेकावर सोडून द्यायला हवा; परंतु योग्य कामकाज होण्यासाठी एखाद्या सदस्याला विरोधी पक्षनेतेपद दिले गेले पाहिजे. कारण तो निवडून दिलेल्या लोकशाही व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत असतो, असा माझा विश्वास आहे. त्यामुळे नियमात बसत नसतानादेखील अध्यक्ष आपल्या विशेषाधिकाराचा उपयोग करून एखाद्या सदस्याची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करू शकतात. कुणाला बनवावे, ही बाब सभागृहातील वेगवेगळ्या सदस्यांच्या संख्येवरून निश्चित करण्यात यावी, असेही ते म्हणाले.१० टक्के संख्याबळ नसल्याने विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस पात्र नसल्याचा अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी अभिप्राय दिला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)
नियम असो वा नसो लोकशाहीत विरोधी पक्षनेता आवश्यकच
By admin | Updated: July 28, 2014 02:29 IST