(स्थळ : चित्रपट निमार्त्याचं आॅफिस. मराठी चित्रपटासाठी नव्या कलाकारांच्या ‘आॅडिशन्स’ सुरू.)डायरेक्टर : आजकाल जुन्या पिक्चरमधल्या गाजलेल्या गाण्यांचा मुखडा वापरून टीव्ही सिरीयल्स तयार केल्या जाताहेत. मग आपणही ‘कुठं नेऊन ठेवलाऽऽत महाराष्ट्र माझा?’ असलं राजकीय टायटल वापरू या!निर्माता : दि ग्रेट. ताबडतोब बोलवा कलाकारांना. (प्रत्येकजण आत येऊन ‘आॅडिशन’ देऊ लागतो.)पहिला माणूस : (जोरजोरात ‘हात’वारे करत) माणूस मंगळावरचं पाणी शोधायला निघाला, पण आजही कैक वाड्या-वस्त्यांवर पाणी नाही. पाणी आहे तर लाईट नाही. लाईट आहे तर लोडशेडिंगचं नीट प्लॅनिंग नाही. रस्ते बांधले, पण काम तुमच्याच ठेकेदाराला. एक वर्षात खड्ड्यांची दुरूस्तीही त्याच्याच चेल्याला. विकासकामाच्या नावाखाली साठ वर्षात तुंबड्या भरल्या तुमच्याच लोकांनी. कुठं नेऊन ठेवलाऽऽत महाराष्ट्र माझा? दुसरा : (भिंतीवरचं ‘घड्याळ’ पहात) दूध सोसायटी तुमची. बँक तुमची. सूतगिरणी तुमची अन् साखर कारखानाही तुमचाच. साखरही तुम्हीच वाटायची अन् गूळही तुम्हीच लाटायचा. शंभर कोटींचा कालवा हजार कोटींवर न्यायचा. अर्धवट काम करून ‘कोरडं धरणही म्हणे तुम्हीच भिजवायचं’. भाषा मग्रुरीची अन् देहबोली उपकाराची. कुठं नेऊन ठेवलाऽऽत महाराष्ट्र माझा?तिसरा : (‘हातातलं घड्याळ’ चाचपत) पंधरा वर्षे एकत्र भरपेट ढेकरा दिलात अन् आता आरोप-प्रत्यारोपाच्या ‘गॅस’नं वातावरण दूषित करू लागलात. मांडीला मांडी लावून इतके दिवस एकाच ताटात चाटून पुसून खाल्लत अन् आता पाठीला पाठ टेकून खंजिराची भाषा करू लागलात. कुठं नेऊन ठेवलाऽऽत महाराष्ट्र माझा?चौथा : (‘कमळाचं फूल’ हुंगत) बाळासाहेबांचं नाव घेऊन महाराष्ट्रात घुसलात. सैनिकांचा भगवा सदरा धरून घरोघरी शिरलात अन् आता परस्पर ‘छत्रपतींचा आशीर्वाद’ दाखवून मराठी मानसिकतेच्या ठिकऱ्या उडवू लागलात. सीमा बांधवांच्या वेदनांशी ना तुम्हाला सुख-दु:ख. महाराष्ट्राचा गुजरात बनविताना मराठी स्वाभिमानाशी ना देणं-घेणं. कुठं नेऊन ठेवलाऽऽत महाराष्ट्र माझा?पाचवा : (‘शिवबंधन’ कुरवाळत) जयंतीच्या पावत्या फाडून आजपावेतो राजकारण करत आलात. निष्ठावंत सैनिकांना आपापसांत लढवत ठेवून आता पुन्हा एक व्हायला निघालात. तुमच्यापायी एकमेकांची डोकी फोडायला निघालेले, आता देशोधडीला लागले. तुम्ही मात्र ‘आनंदीबाई’च्या सल्ल्यानं निर्णय घेत निघालात. कुठं नेऊन ठेवलाऽऽत महाराष्ट्र माझा?सहावा : (‘रेल्वे इंजिन’चा आवाज काढत) झुक झुक तुमची ‘सुपा’तली गाडी. भारी-भारी संवादावर टाळ्या घेत गेलात; पण प्रत्यक्षातली कामं मात्र ‘ब्लू प्रिंट’सारखी अडगळीत ठेवून बसलात. ताटातल्या मिठाला विसरलात, खाऊ घातलेल्या सुपाला मात्र आळवून-आळवून जागलात. भुजबळांच्या टोलला धडका देताना नाशकात मात्र त्यांच्यासोबत बसलात. कुठं नेऊन ऽऽऽनिर्माता : (गोंधळून डायरेक्टरच्या कानात) हे सारे कलाकार एवढ्या तयारीचे कसं काय? कुठून आलेत हे?डायरेक्टर : (खुलासा करत) हे सारे कलाकार वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत. आपला पिक्चर म्हणजे इलेक्शनमधली त्यांच्या पक्षाची जाहिरातच आहे, असं कुणीतरी चुकून सांगितलं म्हणे त्यांना !- सचिन जवळकोटे
कुठं नेऊन ठेवलाऽऽत महाराष्ट्र माझा?
By admin | Updated: October 6, 2014 12:06 IST