मेहाम (हरियाणा) : याआधी कोणत्याच सरकारने काही केले नाही आणि आपले सरकार सत्तेत आल्यानंतरच सर्व काही करण्यात आले, असे दाखविण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चालविलेला आहे, अशी परखड टीका काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली आहे. सत्तेत आल्यानंतर विदेशात जमा असलेला काळा पैसा भारतात परत आणण्याचे आश्वासन मोदींनी दिले होते. त्या आश्वासनाचे काय झाले, असा सवालही सोनिया गांधी यांनी उपस्थित केला. हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातील मेहाम येथे काँग्रेसच्या निवडणूक प्रचार सभेत त्या बोलत होत्या.
सोनिया गांधी म्हणाल्या, ‘देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून जणू काहीही चांगले घडलेले नाही आणि आपण एका रात्रीत प्रत्येकाचे भविष्य उजळून टाकू, असे वातावरण ते निर्माण करीत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याच्या दिशेने त्यांनी एकतरी पाऊल उचलले आहे काय? महागाई कमी झाली काय? गरिबांना स्वस्त दरात भोजन मिळत आहेत काय? बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे काय? सत्तेवर आल्यानंतर शंभर दिवसांच्या आत विदेशातील काळा पैसा भारतात परत आणण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. त्याचे काय झाले? या दिशेने एखादे पाऊल तरी उचलले आहे काय? नक्कीच नाही.’
काँग्रेस सरकारने मागील दहा वर्षात केलेल्या विकासकामाच्या आधारावरच पक्षाला मतदान करण्याचे आवाहन सोनिया गांधी यांनी यावेळी केली. पूर्वीच्या संपुआ सरकारने आखलेल्या धोरणांचे श्रेय भाजपा स्वत:कडे घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला. भावनेच्या भरात वाहून जाऊ नका. खोटय़ा आश्वासनांना बळी पडू नका. गतिशील विकासासाठी पुन्हा काँग्रेसचे सरकार यावे यासाठी शहाणपणाने मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले. (वृत्तसंस्था)
च्मोदींवर प्रहार करताना सोनिया गांधी पुढे म्हणाल्या, ‘रिकामे जहाज जास्तच गोंगाट करते. मोठय़ाने बोलता म्हणजे तुम्ही खरेच बोलता असे नव्हे.