नवी दिल्ली - भारतीय जनता पार्टीला दीर्घ काळापासून पुढील राष्ट्रीय अध्यक्षाची वाट पाहावी लागत आहे. १५ ऑगस्टच्या आधी भाजपाला नवीन अध्यक्ष मिळेल असं बोललं जात होते. मात्र जगदीप धनखड यांच्या अचानक उपराष्ट्रपतिपदाच्या राजीनाम्यानंतर दिरंगाई झाली. आता यावर्षीच्या अखेरीस होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित होण्यापूर्वी भाजपाला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळू शकतो आणि नव्या अध्यक्षांच्या नेतृत्वात भाजपा बिहारची निवडणूक लढेल अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे.
रिपोर्टनुसार, भाजपा अध्यक्षपदासाठी पक्षातील वरिष्ठ नेते सातत्याने चर्चा करत आहेत. आरएसएस आणि भाजपा वरिष्ठ नेत्यांमध्येही अध्यक्षपदासाठी जवळपास १०० हून अधिक नेत्यांशी चर्चा झाली आहे. ज्येष्ठ केंद्रीय मंत्री, माजी प्रमुख, आरएसएसचे संघ प्रचारक यांच्याशी चर्चा करूनच नवीन राष्ट्रीय अध्यक्षाची निवड केली जाणार आहे. भाजपा अध्यक्षपदाबाबत झालेल्या विलंबामागे एक कारण म्हणजे ९ सप्टेंबरला उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक होणार आहे. जगदीप धनखड अचानक राजीनामा देतील आणि उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक लागेल याचा अंदाज भाजपाला नव्हता.
एनडीएने अलीकडेच उपराष्ट्रपतिपदासाठी सी.पी राधाकृष्णन यांचे नाव उमेदवार म्हणून घोषित केले आहे तर इंडिया आघाडीकडून सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. संख्याबळानुसार सी.पी राधाकृष्णन यांचा विजय होईल असं बोलले जाते. या प्रक्रियेमुळे भाजपाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोण असेल याची चर्चा थंड झाली आहे.
दरम्यान, भाजपा पक्षाच्या संविधानानुसार, सर्व राज्यांपैकी कमीत कमी १९ राज्यांमधून भाजपा अध्यक्षांची निवड होणे गरजेचे आहे. मागील महिन्यापर्यंत २८ राज्यांना नवीन भाजपा प्रदेशाध्यक्ष मिळाले आहेत. परंतु आजही उत्तर प्रदेश, गुजरात, दिल्लीसह अनेक बड्या राज्यांमधील प्रदेशाध्यक्षांची निवड बाकी आहे. सध्या पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा आहेत, ज्यांना २०२० मध्ये जबाबदारी मिळाली होती. मागील वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांचा कार्यकाळ संपला असून त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती.