दिल्ली विधानसभेच्या आवारात सोमवार दुपारी अत्यंत खळबळजनक घटना घडली. अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या विधानसभेचा व्हीआयपी गेट तोडून एका अज्ञात पांढऱ्या रंगाच्या कारने आवारात प्रवेश केला. अवघ्या पाच मिनिटांत घडलेल्या या नाट्यमय घडामोडीमुळे सुरक्षा यंत्रणेचे वाभाडे निघाले. याप्रकरणाती पोलिसांनी नोंद केली असून आरोपी चालकाला पकडण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. या घटनेवर प्रत्यक्षदर्शीने आपली प्रतिक्रिया दिली असून विधानसभेच्या आवारात कार शिरल्यानंतर पुढील पाच मिनटं काय- काय घडले? याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी २.०० वाजताच्या सुमारास विधानसभेच्या गेट क्रमांक २ जवळ एक पांढऱ्या रंगाची कार थांबली. त्यानंतर कोणाला काही समजण्यापूर्वीच या कारने गेटला जोरदार धडक दिली आणि विधानसभेच्या आवारात प्रवेश केला. त्यावेळी मोठा आवाज झाल्याने परिसरात एकच खळबळ माजली. तिथे उपस्थित असलेल्या रिक्षा चालक आणि नागरिकांना त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर कारचालक तिथून पळून गेला. धक्कादायक बाब म्हणजे, पळून जाण्यापूर्वी चालकाने विधानसभेच्या आवारात एक फुलांचा गुच्छ ठेवला. या प्रकारामुळे पोलीसही चक्रावून गेले असून पुढील तपास सुरू आहे.
प्रत्यक्षदर्शीने सांगितला घटनेचा थरार
"विधानसभेच्या आवारात गेट क्रमांक २ जवळ एक पांढऱ्या रंगाची कार उभी होती. सुरुवातीला आम्हाला वाटले की, कारचा टायर फुटला आहे. परंतु, तेव्हा कारने गेट तोडून आत प्रवेश केल्याने आम्ही सतर्क झालो. त्या गाडीचा वेग इतका होता की कोणालाही जवळ जायची हिंमत झाली नाही. ही कार जवळपास पाच मिनिटे विधानसभेच्या आवारात फिरत होती. नंतर ती तिथून निघून गेली", असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
पोलीस तपास सुरू
प्राथमिक माहितीनुसार, कारवर उत्तर प्रदेशातील नोंदणी क्रमांक आहे. पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे ताब्यात घेतले असून कारचा नेमका मार्ग शोधला जात आहे. २४ तास तैनात असलेली सुरक्षा आणि बॅरियर्स असताना एका अज्ञात कारने विधानसभेत प्रवेश केल्यानंतर पळून जाण्यात यश कसे मिळवले? याबाबत आता वरिष्ठ स्तरावर चौकशी सुरू आहे अद्याप गाडी आणि त्यातील व्यक्तीचा पत्ता लागलेला नाही. दिल्ली पोलिसांनी शहरभर नाकाबंदी केली असून लवकरच आरोपीला बेड्या ठोकल्या जातील, असा विश्वास व्यक्त केला आहे.
Web Summary : A car breached Delhi Assembly security, causing chaos. A witness described the five-minute frenzy, as the car entered and fled the premises after dropping flowers, prompting a police investigation and city-wide search.
Web Summary : दिल्ली विधानसभा में एक कार सुरक्षा तोड़कर घुसी, जिससे अफरा-तफरी मच गई। एक प्रत्यक्षदर्शी ने पांच मिनट के उन्माद का वर्णन किया, क्योंकि कार फूल गिराकर परिसर में प्रवेश कर भाग गई, जिससे पुलिस जांच और शहरव्यापी तलाशी शुरू हो गई।