कुजबूज--आणखी दोन
By admin | Updated: June 17, 2015 01:33 IST
वेगळ्या युतीची शक्यता
कुजबूज--आणखी दोन
वेगळ्या युतीची शक्यतापणजी महापालिकेची निवडणूक पुढच्या मार्च महिन्यात होऊ घातली आहे. साधारणत: ९ महिने बाकी आहेत. यापूर्वी कधी झाली नाही अशी युती महापालिका निवडणुकीवेळी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. पणजी महापालिका निवडणूक दरवेळी बाबूश गट व भाजप गट एकमेकाविरुद्ध लढवत आला आहे. मात्र, येत्या मार्चमध्ये आमदार बाबूश मोन्सेरात हे भाजपशी युती करूनच महापालिका निवडणूक लढवतील, असे मोन्सेरात गटातील अनेक नगरसेवकांना वाटते. भाजपला बाबूश गटाची गरज नाही; पण मोन्सेरात हे भाजपविरोधात निवडणूक लढवू पाहणार नाहीत. ते स्वत:च युतीचा प्रस्ताव भाजपला देतील, अशी माहिती मिळते; कारण मोन्सेरात अतोनात भाजप नेत्यांच्या प्रेमात पडले आहेत. त्यांनी प्रथमच गेल्या निवडणुकीवेळी महापौरपद भाजपसाठी सोडले व उपमहापौरपद स्वत:च्या गटासाठी घेतले. युतीची ही पहिली पायरी ठरली आहे. राजकारणात टिकायचीही शक्कल तीच आहे!...............................महामोर्चाची तयारीसध्याच्या सरकारच्या काळात राज्यातील एकही प्रश्न सुटत नाही. जी आश्वासने दिली जातात, त्यांचे पालन होत नाही. मुख्यमंत्री व मंत्र्यांनी आश्वासन दिले तरी, प्रशासनाच्या स्तरावर प्रस्ताव अडकतात. यामुळे निराश व हताश (आणि हतबल!) झालेले समाजातील विविध वर्ग आता येत्या महिन्यात विधानसभेवर महामोर्चा नेण्याची तयारी करत आहेत. विधानसभा अधिवेशन येत्या महिन्याच्या अखेरीस होणार आहे. क्रीडा खात्याचे कंत्राटी कर्मचारी, मजूर कंत्राट भरतीचे सुरक्षा रक्षक, पणजी महापालिकेचे कामगार, खाणग्रस्त भागातील ट्रक व्यावसायिक व तेरेखोल प्रकल्पाविरुद्धचे आंदोलक या सगळ्यांनी मिळून एकत्रितरीत्या महामोर्चा नेण्याची पूर्वतयारी सुरू केली आहे. त्यासाठी गुप्तपणे बैठकाही होत आहेत. १०८ सेवेचे कर्मचारीदेखील त्या महामोर्चात सहभागी होऊ शकतात......................................