जीएसटी कपातीनंतर भारतीय रेल्वेने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. जीएसटी दरात झालेल्या कपातीचा थेट फायदा प्रवाशांना देण्यासाठी भारतीय रेल्वेने आपल्या 'रेल नीर' या पाण्याच्या बाटलीची किंमत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता रेल्वे स्टेशन आणि ट्रेनमध्ये मिळणारे 'रेल नीर' पूर्वीपेक्षा स्वस्त मिळणार आहे.
रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या निर्देशानुसार, 'रेल नीर'च्या बाटलीचे नवे दर २२ सप्टेंबरपासून देशभरात लागू होतील. १ लीटरची पाण्याची बाटली जिची पूर्वीची किंमत ₹१५ होती, ती आता ₹१४ मिळणार आहे. तर ५०० मिलीची बाटली जिची किंमत पूर्वी ₹१० होती, ती आता ₹९ ला मिळणार आहे. पॅकेज्ड पिण्याच्या पाण्यावरचा GST आधी १२% होता. सुधारणा नंतर हा दर ५% करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे रेल्वे प्रवाशांना, विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासात, मोठा आर्थिक फायदा होणार आहे. रेल्वे मंत्रालयाने जीएसटी दर कपातीचा लाभ थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. केवळ 'रेल नीर'च नाही, तर रेल्वेच्या परिसरातील आणि ट्रेनमध्ये विकल्या जाणाऱ्या IRCTC/रेल्वेने मंजूर केलेल्या इतर ब्रँड्सच्या पाण्याच्या बाटल्यांच्या दरातही कपात करण्यात आली आहे.
जीएसटीचा फायदा...
जीएसटी दोन स्लॅबमध्ये (५% आणि १८%) कमी करण्यात आला आहे. यामुळे अनेक वस्तू स्वस्त होतील. साबण, टूथपेस्ट आणि भारतीय ब्रेड यासारख्या दैनंदिन वस्तूंवरील जीएसटी ५% किंवा शून्य करण्यात आला आहे. जीवनरक्षक औषधांवरील जीएसटी १२% शून्य करण्यात येत आहे. यामुळे आरोग्य सेवा स्वस्त होतील. याव्यतिरिक्त, दुचाकी, लहान कार, टीव्ही, एअर कंडिशनर आणि सिमेंटवरील जीएसटी २८% वरून १८% पर्यंत कमी करण्यात आला आहे.