Waqf bill jpc meeting News: वक्फ सुधारणा विधेयक जेपीसी अर्थात संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आलेले आहे. या समितीच्या गेल्या काही महिन्यांपासून बैठक सुरू आहेत. शुक्रवारी झालेल्या बैठकीत प्रचंड गोंधळ झाला. यात विरोधी बाकावरील १० खासदारांना निलंबित करण्यात आले. यात ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, एमआयएमचे असदुद्दीने ओवेसी यांचाही समावेश आहे. (10 Opposition MPs suspended including Arvind Sawant, Asaduddin Owaisi)
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर शुक्रवारी (२४ जानेवारी) संयुक्त संसदीय समितीची बैठक झाली. सुधारणा विधेयकाच्या मसुद्याचा अभ्यास करण्यासाठी विरोधी खासदारांना पुरेसा वेळ दिला जात नाहीये, या मुद्द्यावरून वाद सुरू झाला.
जेपीसी बैठकीत काय काय घडलं?
भाजपचे खासदार जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखालील होत असलेल्या समितीच्या बैठकीत काश्मिरचे मीरवाईज उमर फारूकी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाचे म्हणणं ऐकून घेतलं जाणार होतं. पण, त्यापूर्वीच विरोधी पक्षाच्या खासदारांनी आक्षेप घेतला.
विरोधी पक्षाच्या खासदारांनी आरोप केला की, दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप वक्फ सुधारणा विधेयकावरील अहवाल तातडीने मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. सत्ताधारी आणि विरोधी खासदारांमध्ये वादविवाद सुरू झाला.
तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी, काँग्रेसचे सय्यद नासिर हुसैन हे बैठकीवर बहिष्कार टाकत निघून गेले. विरोधी पक्षाच्या खासदारांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केल्यानंतर अध्यक्षांनी दहा खासदारांना एका दिवसासाठी निलंबित केले.
कोणत्या खासदारांचं निलंबन?
कल्याण बॅनर्जी, मोहम्मद जावेद, ए. राजा, असदुद्दीन ओवेसी, नासिर हुसैन, मोहीबुल्लाह, मोहम्मद अब्दुला, अरविंद सावंत, नदीम उल हक आणि इमरान मसूद यांना एका दिवसासाठी निलंबित करण्यात आले.