रविवारी संध्याकाळी ईशान्य भारतात अचानक जमीन हादरली. आसाममधील उदलगुरी जिल्ह्यात ५.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला, ज्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली. दरम्यान, आसाममधील नागाव जिल्ह्यातील एका रुग्णालयात उपस्थित असलेल्या नर्सनी आपल्या धाडसाने नवजात बालकांचे प्राण वाचवले. जोरदार भूकंपाच्या झटक्यांमध्येही त्यांनी मुलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले. भूकंपाच्या धक्क्यांमध्ये जेव्हा सर्व काही हादरू लागले, तेव्हा परिचारिकांनी लगेच धाडस दाखवले आणि मुलांचे पाळणे धरून ठेवले.
भूकंपाच्या वेळी रुग्णालयाचे वातावरण अधिक संवेदनशील होते. कारण तेथे अनेक नवजात बाळांना दाखल करण्यात आले होते. भूकंप होताच, वॉर्डमध्ये उपस्थित असलेल्या नर्सनी तात्काळ बाळांच्या दिशेने धाव घेतली. कोणताही अपघात होऊ नये, म्हणून त्यांनी बाळांचे पाळणे घट्ट धरून ठेवले. एका व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसून येते की, दोन परिचारिका नवजात बाळांची काळजी घेत आहेत आणि बाळांना सुरक्षित ठेवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी त्या सज्ज आहेत. त्यांच्या धाडसाचे सोशल मीडियावर खूप कौतुक केले जात आहे.
भूकंपाचे केंद्र आणि परिणामराष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी ४:४१ वाजता भूकंपाची नोंद झाली. त्याचा केंद्रबिंदू आसाममधील उदलगुरी जिल्ह्यात जमिनीपासून सुमारे ५ किलोमीटर खोलीवर होता. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की रुग्णालये, घरे आणि कार्यालयांमधील लोक घाबरून बाहेर पडले. तथापि, अद्याप कोणत्याही मोठ्या जीवितहानीबद्दल कोणतीही बातमी नाही.पश्चिम बंगाल आणि भूतानमध्येही जाणवले भूकंपाचे धक्के!आसाम व्यतिरिक्त, पश्चिम बंगाल आणि भूतानमध्येही या भूकंपाचे धक्के जाणवले. अचानक जमीन हादरू लागली आणि लोक सुरक्षित ठिकाणाच्या शोधत पळू लागले. भूकंपाचे धक्के तीव्र असल्याने लोकांचा गोंधळ उडाला होता.