अहमदाबाद – गुजरातच्या पडरा तालुक्यात तालिया भाथा गावात सध्या एका दहशतीनं लोकांच्या मनात गावात एकटं फिरण्याची भीती निर्माण झाली आहे. याठिकाणी अनेक गावकरी झाडावर राहत असल्याचं चित्र दिसून येत आहे. इतकचं नाही तर झाडावर व्यवस्थित राहता यावं यासाठी फांदीला खाटा बांधून त्यावर अंथरुन टाकून गावकरी तिथेच पहारा देत आहेत. नेमकं काय घडलं? हे आपण जाणून घेऊया.
या गावात एक भलामोठा वळू फिरतोय. त्याच्या दहशतीनं गावकऱ्यांचे जगणं कठीण झालं आहे. त्यामुळे अनेक गावकरी कुटुंबासह झाडावर खाटा बांधून बसल्याचं दिसून येते. वळूच्या दहशतीनं गावकऱ्यांना दिवस-रात्र याच झाडावर काढावी लागतेय. अनेक लहान मुलंही त्यांच्या आई वडिलांसह झाडावर झोपत असल्याचं दिसून येते. वळूच्या भीतीमुळे जनावारांना चारा घालण्यासही मिळत नाही. त्यामुळे जनावरांवर उपासमारीची वेळ आली आहे.
माही नदीच्या किनारी तालिया भाथा हे गाव आहे. मोकाट सुटलेल्या वळूने गावातील अनेकांना गंभीररित्या जखमी केले आहे. याठिकाणी जनावारांसाठी मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध असतो. अनेक गुरं चरणारे लोकं जनावारांना चारा देण्यासाठी याठिकाणी तात्पुरती झोपडी करुन राहतात. पण या वळूने अनेकांसमोर मोठं आव्हान निर्माण केले आहे.
वळूला पकडण्यासाठी प्रयत्न
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील १०-१५ दिवसांत या वळूनं ४ लोकांना मारलं आहे. काही ठराविक लोकांवरच तो वळू हल्ला करत असल्याचं दिसून येते. त्यामुळे कदाचित त्यांनी वळूला नुकसान पोहचवलं असल्याने तो रागात हे करत असेल असं अधिकाऱ्यांना वाटतं. तरीही या मोकाट वळूला पकडण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं अधिकारी म्हणाले.