लखनौ : हिंदू महासभा या संघटनेने ‘व्हॅलेंटाईन डे’ला प्रत्युत्तर म्हणून शनिवारी वसंतपंचमी साजरी करण्याचे ठरविले आहे. पाश्चात्त्य संस्कृतीला विरोध करण्यासाठी दरवर्षी पारंपरिक पद्धतीने हा दिवस साजरा केला जाणार असल्याचे या संघटनेचे अध्यक्ष चंद्रप्रकाश कौशिक यांनी स्पष्ट केले.वसंतपंचमी दरवर्षी ‘व्हॅलेंटाईन डे’ला लागूनच येते. विविध राज्यांमध्ये वसंतोत्सव साजरा होत असतो, असे असतानाही पाश्चिमात्य संस्कृती का अंगीकारायची? असा सवाल त्यांनी केला.आमचे चमू प्रमुख शहरे आणि महानगरांमधील विविध मॉल, पार्क, ऐतिहासिक वास्तूंना भेटी देऊन हा दिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करतील. त्यासाठी हिंदू महासभेने देशव्यापी व्यूहरचना केली आहे. जे प्रेमीयुगुल सार्वजनिकरीत्या प्रेमप्रदर्शन करीत असतील त्यांना विवाह करण्याचा सल्ला दिला जाईल. ज्यांना लग्नाची खात्री नाही. मात्र, केवळ मजा म्हणून प्रदर्शन करीत असतील, तर आम्ही त्यांना वाईट परिणामांचा इशारा देऊ, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)