नवी दिल्ली : भाजपाचे मुत्सद्दी नेते आणि विविध राजकीय विचारधारांचे आघाडी सरकार चालविण्यात सर्वाधिक यशस्वी ठरलेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी तसेच स्वातंत्र्यसैनिक, हिंदू महासभेचे नेते व बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक पं. मदन मोहन मालवीय (मरणोत्तर) यांना भारत सरकारने ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर केला़ ओजस्वी वाणी लाभलेला कविमनाचा राजकारणी आणि सरस्वतीचे वरदान लाभलेला द्रष्टा शिक्षणतज्ज्ञ व तेजस्वी स्वातंत्र्यसेनानी अशा दोन महानुभावांना एकाच वेळी हा सन्मान देण्याच्या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. गुरुवारी वाजपेयी यांचा वाढदिवस असून ते वयाची नव्वद वर्षे पूर्ण करीत आहे़ पं. मालवीय यांचीही उद्या १५३ वी जयंती आहे़ याचे औचित्य साधून त्याच्या पूर्वसंध्येला या सन्मानाची घोषणा करण्यात आली़ राष्ट्रपती भवनाने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली़ येत्या प्रजासत्ताक दिनी हा सन्मान प्रदान करण्यात येईल़आतापर्यंत ४३ महनीय व्यक्तींना भारतरत्नने गौरविण्यात आले आहे़ गतवर्षी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि शास्त्रज्ञ सी़एऩआऱ राव यांना या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात आले होते़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: राष्ट्रपतींकडे या द्वयींना भारतरत्नने गौरविण्यात यावे, अशी विनंती केली होती़ या पुरस्कारासाठी कुठल्याही औपचारिक शिफारशीची गरज नाही़ गेल्या अनेक वर्षांपासून वाजपेयींना भारतरत्न देण्याची मागणी होत आहे़
वाजपेयी, मालवीय भारतरत्नचे मानकरी
By admin | Updated: December 25, 2014 03:06 IST