Vaishno Devi Yatra Resumes: तीन आठवड्याच्या शुकशुकाटानंतर वैष्णो देवी मंदिर पुन्हा गजबले आहे. भूस्खलानाची घटना घडल्यानंतर मोठी जीवित हानी झाली होती. त्यामुळे प्रशासनाने वैष्णो देवी यात्रा स्थगित केली. पण, भाविकांकडून धरणे आंदोलन करत यात्रा सुरू करण्याच्या मागणी जोर धरला आणि मंदिराचे दरवाजे उघडले गेले. १७ सप्टेंबरपासून वैष्णो देवी यात्रा सुरू करण्यात आली. २६ ऑगस्ट रोजी यात्रा स्थगित करण्यात आली होती.
वैष्णो देवी यात्रा सुरू असतानाच २६ ऑगस्ट रोजी प्रचंड पावसामुळे भूस्खलन झाले. यात तब्बल ३४ भाविकांचा मृत्यू झाला होता. तर २२ जण जखमी झाले होते. या दुर्घटनेनंतर दोन्ही मार्ग बंद करण्यात आले आणि यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
२२ दिवसानंतर यात्रा पुन्हा सुरू
भूस्खलनाच्या घटनेनंतर २२ दिवसांनी वैष्णो देवी यात्रा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मंदिराकडे येणारे दोन्ही मार्ग खुले करण्यात आले आहेत. त्रिकुट डोंगरावर वैष्णो देवीचे मंदिर असून, बुधवारपासून (१७ सप्टेंबर) यात्रा सुरू झाली आहे.
वैष्णो देवी मंदिर संस्थानने मंगळवारी याबद्दलची घोषणा केली. सोशल मीडियावर मंदिर संस्थानकडून पोस्ट शेअर करण्यात आली होती. हवामान पुन्हा अनुकूल झाल्याने १७ सप्टेंबरपासून यात्रा पुन्हा सुरू होत आहे. भाविकांना आवाहन आहे की, त्यांनी अधिकृत माध्यमांतूनच याबद्दलची माहिती घ्यावी, असे देवस्थानने म्हटले होते.
दोन दिवस आधीच सुरू होणार होती यात्रा
कटरा येथील भाविकांसाठी असलेल्या शिबिरात काही भाविकांनी यात्रा सुरू करण्याची मागणी करत आंदोलन केले होते. यात्रा पुन्हा सुरू करण्याच्या मागणीने जोर धरल्याने मंदिर संस्थानने दोन दिवसांपूर्वीच यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. पण, पावसाचा जोर वाढल्याने तो टाळण्यात आला.
काही भाविक सुरक्षा भेदून मंदिराकडे जाण्याचा प्रयत्न करू लागले होते. काही भाविकांनी आंदोलन सुरू केले होते. त्यामुळे मंदिर संस्थानने यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला.