वडनगर : छोटा नरेंद्र इथेच चहा विकायचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 01:28 AM2017-11-29T01:28:56+5:302017-11-29T01:29:21+5:30
हे गाव १४ मे २0१४ पासून सर्वांना माहीत झालं. सुमारे २७ हजार लोकसंख्या असलेल्या या गावाची माहिती गेली दोन दशके संपूर्ण गुजरातला होती. इथेच नरेंद्र दामोदरदास मोदी यांचा जन्म झाला.
- नंदकिशोर पुरोहित
वडनगर (जिल्हा मेहसाणा) : हे गाव १४ मे २0१४ पासून सर्वांना माहीत झालं. सुमारे २७ हजार लोकसंख्या असलेल्या या गावाची माहिती गेली दोन दशके संपूर्ण गुजरातला होती. इथेच नरेंद्र दामोदरदास मोदी यांचा जन्म झाला.
निवडणुकीसाठी गुजरातला येणारा प्रत्येक पत्रकार वडनगरला येतोच. तिथे पोहोचलो, तेव्हा गावाच्या वेशीवरील पारावर अनेक बुजुर्ग मंडळी बसली होती. चर्चा अर्थातच निवडणुकीची होती. सोमाभाई पटेल सुरुवातीपासून भाजपसमर्थक. पण यंदा तसे नाही, कारण पटेल समाजाचा दबाव आहे. दोन दशकांत वडनगरमध्ये काहीच बदल झाला नाही, असे ते म्हणाले. काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान आले, मेहसाणाहून तारंगाला जाणारी मीटर गेज ब्रॉडगेज केली जात असल्याचे ते म्हणाले. त्यावर कांतीभाई शहा म्हणाले की, हाटकेश्वर महादेव मंदिराकडे जाणारा रस्ता वर्षभरापूर्वी सीमेंटचा करण्यात आला. पण पंतप्रधानांना खुश करण्यासाठी नगरपालिकेने त्या रस्त्यावर डांबर ओतून तो नवा असल्याचे भासवले.
त्या पारावरून वडनगर स्टेशनवर गेलो. एखाद-दुसरा मजूर तिथे होता. नाव नव्याने रंगवण्यात आल्याचे दिसत होते. मीटरगेजची लाइन उखडली होती. रेल्वेचे अभियंता तिथे पोहोचले. वडनगर ते माउंट अबू ब्रॉडगेज मंजूर झाली. त्यातील ५४ किलोमीटरचे काम आम्ही करायचे आहे, उरलेले काम उत्तर रेल्वे करेल, असे ते म्हणाले.
तिथेच एक स्टॉल दिसला. त्यावर एक गुजरातीतील फलक होता. हे काय लिहिले आहे, असे विचारता, एकाने सांगितले की, ‘बाल नरेंद्र अय्यां चाय वेचता हता’. (छोटा नरेंद्र इथे चहा विकत असे.) असे लिहिले आहे. जिथे पंतप्रधान चहा विकत होते, त्या स्टॉलची अवस्था फारच वाईट असल्याचे जाणवले. असे का, या प्रश्नावर रेल्वे अधिकारी म्हणाले की, याबाबत आम्हाला काहीही सूचना आलेल्या नाहीत. स्टेशनवर जे काम सुरू आहे, त्यासाठी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आठ कोटी रुपयांतून. प्रतीक्षालय, मुख्य प्रवेशद्वार, तसेच स्टेशन
मास्टर, गार्ड व कर्मचाºयांना
बसण्याचे तसेच त्यांचे कार्यालय यातून होत आहे.
बाहेर कमर अली नावाची व्यक्ती भेटली. ती म्हणाली, वडनगरमध्ये रोजगाराची व्यवस्था हवी. गुजरात डेव्हलपमेंट कॉर्पोरशनच्या अभावी इथे एकही उद्योग नाही. शेती, पशुपाल यावरच लोक अवलंबून आहेत. विकासाची गंगा वडनगरमध्येही यायला हवी, असाच त्याचा सूर होता.
नगरपालिकेचे कार्यालयही अलीकडेच बांधले. तिथे कार्यालय अधीक्षक अल्पेश पटेल कामात व्यग्र होते. ते म्हणाले की, येथे पायाभूत सुविधांची कमतरता नाही, रस्त्यांवरील दिवे, पाणी व्यवस्था आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गुजरात हाऊसिंग बोर्डाने घरे बांधण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी १२00 लोकांनी अर्ज केले आहेत. पण एकही अर्ज अद्याप मंजूर झालेला नाही. वडनगरमध्ये ८ आॅक्टोबर २0१७ रोजी ३00 खाटांचे मेडिकल कॉलेज सुरू झाले आहे. त्यात यावर्षी १५0 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. खाटांची संख्या भविष्यात ६५0 केली जाईल, असे ते म्हणाले.
नगरपालिकेसमोर एका चहाच्या दुकानात गेलो. तिथे अनेक लोक काही तरी गुजरातीत बोलत होते. ड्रायव्हर म्हणाला की, साहेब, लोक शौचालयाविषयी बोलत आहेत. त्या योजनेत अनेक त्रुटी आहेत, अशी त्यांची तक्रार आहे, असे ते म्हणताहेत. मनात विचार केला...शौचालय तर पंतप्रधानांचा प्रिय विषय आहे.
म्हणे गाव ओडीएफ, तरीही महिला...
परत नगरपालिका कार्यालयात जाईतपर्यंत अल्पेशभाई गेले होते. क्लार्कला शौचालय योजनेविषयी विचारले, तर तो म्हणाला की, २७९४ शौचालय मंजूर झाले. सारे बांधूनही तयार झाले. वडनगरला ओडीएफमुक्त (हागणदारीमुक्त) म्हणून जाहीर केले आहे. पण लोकांना त्यासाठीचा निधीच मिळालेला नाही. वडनगरहून विसापूरकडे निघालो. जेमतेम दीड-दोन किलोमीटरवर अनेक महिला हातात बाटल्या घेऊ न निघाल्या होत्या. अचानक त्या क्लार्कची आठवण झाली. तो म्हणाला होता की वडनगर तर आॅगस्टमध्येच ओडीएफ झालंय.