लखनौ : उत्तर प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्याच्या जराखर गावात गेल्या आठवड्यात ओडिशातून आणलेल्या एका महिलेचा भरबाजारात लिलाव होऊन तिला २५ हजारात एका व्यक्तीला विकल्याची घटना उजेडात आली आहे. या घटनेबाबत प्रशासन व पोलीस यंत्रणा यांच्याकडे पुरेशी व वास्तव माहिती नसल्याने हा प्रकार कसा घडला याबाबत कुणी निश्चितपणे सांगू शकत नसले तरी, ओडिशातून स्त्रियांना आणून त्यांची विक्री करणे हा व्यवसाय या भागात चालत असल्याची चर्चा आहे. या महिलेचा लिलाव करणाऱ्या सोहनलाल नामक इसमाने तिला ब्रिजभान कोरी या सर्वाधिक बोली लावणाऱ्या इसमाला २५ हजारात विकले आहे. ओडिशात काही काळ काम करणाऱ्या सोहनलालने या महिलेला जराखर या गावात आणले होते. काही दिवस तिला सोबत ठेवल्यानंतर त्याने तिला विकण्याचा निश्चय केला. या महिलेच्या विक्रीतून चांगली रक्कम मिळावी म्हणून त्याने तिचा लिलाव करण्याचे ठरविले. या लिलावात या महिलेकरिता पहिली बोली १० हजारांची लावली गेली. त्यानंतर एका वृद्ध व्यक्तीने तिच्याकरिता १५ हजारांची बोली लावली. मात्र या महिलेने सदर वृद्धासोबत जाण्यास नकार दिल्याने पुन्हा बोली लावण्यात आली. अखेरीस ब्रिजमोहन कोरी या इसमाने तिला २५ हजारात खरेदी केले असे सांगितले जाते. बुंदेलखंड भागातील एका समाजसेवी संघटनेच्या मते, झारखंड, ओडिशा व प. बंगालमधील गरीब कुटुंबातील मुलींना येथे आणून त्यांची विक्री केली जात असते. (वृत्तसंस्था)
ओडिशाच्या महिलेचा यूपीत लिलाव
By admin | Updated: July 31, 2014 03:45 IST