देहारादून - "पप्पा, आम्ही वाचणार नाही, नाल्यात खूप पाणी आलं आहे..." हर्षिल खोऱ्यातून मुलाने केलेला २ मिनिटांचा अखेरचा कॉल आठवला तरीही नेपाळमध्ये राहणाऱ्या काली देवी आणि पती विजय सिंह यांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नाहीत. नेपाळमधील काली देवी ५ तारखेला १२ वाजता भटवाडीला जाण्यासाठी निघाली होती. ती आणि तिचे पती वाचले परंतु इतर २६ जणांच्या ग्रुपमधील कुणाशीही संपर्क होत नाही. मूळचे नेपाळमधील २६ मजूर हर्षिल खोऱ्यात मजुरी करण्यासाठी आले होते.
हेलिपॅडवर बसून रडतेय आई..
काली देवी ५ तारखेला हर्षिल खोऱ्यातून निघाली होती परंतु इतके मोठं संकट येईल याची तिने कल्पनाही केली नव्हती. ती सातत्याने भटवाडी हेलिपॅडवरून बसून धायमोकलून रडत आहे. आम्हाला हर्षिल खोऱ्यात सोडा, आम्ही आमच्या मुलाला शोधू अशी विनवणी ती सरकारकडे करत आहे. काली देवी आणि विजय सिंह पायपीट करत गंगवाडी इथे गेले परंतु तिथे पूल वाहून गेल्याने पुढे जाऊ शकले नाहीत. हर्षिल खोऱ्यात रस्ते आणि पूल बनवण्याचं काम सुरू होते. त्यावेळी भारतीय लष्कर आणि अनेक मजूर तिथे काम करत होते. परंतु ३ च्या सुमारास झालेल्या ढगफुटीमुळे सगळीकडे विध्वंस पाहायला मिळाला.
उत्तरकाशीपासून ८० किमी दूर हर्षिल खोऱ्याचं महत्त्व खूप आहे. याठिकाणी भारतीय लष्कराचा कॅम्प आहे. सैन्याचे ११ जवानही या दुर्घटनेत अडकले. त्यातील २ जवान वाचले आहेत. ९ जवान अजूनही बेपत्ता आहे. भागीरथी नदीचा वेग इतका प्रचंड होता की मोठमोठे दगडही त्यात वाहून गेले. गंगवाडी जवळचा लोखंडी पूलही नदीच्या प्रवाहात वाहून गेला. त्यामुळे एनडीआरएफ, एसडीआरएफच्या पथकाला घटनास्थळी पोहचायला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. भारतीय लष्करही या मदतकार्यात उतरले आहे.
या परिसरात अल्पावधीत १०० मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. त्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. उत्तराखंडातील धराली गावावर ढगफुटी व त्यामुळे पाणी, दगड, माती याचे लोट वाहत आले आणि त्यांनी डोंगराच्या कुशीत वसलेली घरे, हॉटेल यांचा घास घेतला. या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाली असल्याचा कयास आहे. ढिगाऱ्याखाली अनेक घरे, झाडे, कार गाडल्या गेल्यामुळे अनेक जण अद्यापही अडकले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.