बिजनौर : श्रीनगरमध्ये जमावाने एका पोलीस उपअधीक्षकाची बेदम मारहाण करून हत्या केल्याची घटना ताजी असताना तसाच एक प्रकार उत्तर प्रदेशात बिजनौरमध्ये घडला आहे. काही अज्ञान हल्लेखोरांनी शुक्रवारी रात्री बिजनौर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक शहजोर सिंह मलिक यांची गळा चिरून हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. त्यांचा मृतदेह जवळच्याच शेतात फेकून आणि त्यांची बंदुक घेऊन हल्लेखोर तिथून पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक शहजोर सिंह मलिक मंडावर पोलीस ठाण्यातून बलवली पोलीस ठाण्याकडे जात असताना हा प्रकार घडला आहे. एका बंद पडलेल्या काचेच्या फॅक्ट्रीजवळ त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. शहजोर सिंह यांच्या मृतदेहावर अनेक जखमा आढळून आल्या. एक मृतदेह शेतात पडला आहे, अशी माहिती तेथून जाणाऱ्या एकाने पोलिसांना दिली. पोलीस तिथे पोहोचताच, त्यांना मृतदेह पोलीस अधिकाऱ्याचा असल्याचे लक्षात आले. मलिक यांची हत्या नेमकी का करण्यात आली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे बिजनौरचे पोलीस अधीक्षक अतुल शर्मा यांनी सांगितले. आरोपींना लवकरच आम्ही अटक करू, असे पोलीस अधीक्षक म्हणाले. (वृत्तसंस्था)
उत्तर प्रदेशात पोलीस अधिकाऱ्याची हत्या
By admin | Updated: July 2, 2017 00:46 IST