ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २८ - केंद्रीय प्रशासकीय सेवेत भरती होऊ इच्छिणा-यांसाठी असलेल्या युपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. सिव्हिल सर्व्हिस अॅप्टिट्यूड टेस्टमध्ये इंग्रजी वर प्रभुत्व असलेल्यांना फायदा मिळतो आणि हुषार परंतु इंग्रजीचं ज्ञान तोकडं असलेल्या ग्रामीण भारतातल्या युवकांवर अन्याय होतो अशी भूमिका घेत दिल्लीत विद्यार्थ्यांचं जोरदार आंदोलन सुरू आहे. पंतप्रधान कार्यालयाने या विषयावर तीन सदस्यीय चौकशी समिती नेमली असून या समितीच्या अहवालानंतर परीक्षेची तारीख नक्की करण्यात येणार आहे.
युपीएससीच्या कार्यालयाबाहेर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असून काहीजणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी या विषयावर उच्चस्तरीय बैठक घेतली असून तिला पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग व अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यासह युपीएससीचे अनेक वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
इंग्रजीवर प्रभुत्व नसलेल्यांनाही युपीएससीची परीक्षा तितकीच सुलभ असावी त्यादृष्टीने परीक्षेच्या पॅटर्नमध्ये बदल करावा अशी मुख्य मागणी आंदोलक विद्यार्थ्यांची आहे. या विषयाचे संसदेमध्येही पडसाद यापूर्वी उमटले होते. आता सरकार काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असून युपीएससीच्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलल्या जाऊ शकतात असे संकेत मिळत आहेत.