जयशंकर गुप्त - नवी दिल्ली
काँग्रेस राज्यातील आपला मुख्यमंत्री बदलो वा ना बदलो. विधानसभा निवडणुकीवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. लोकसभेत राज्यातील जनतेने काँग्रेसला नाकारले. त्याचप्रमाणो विधानसभेच्या निवडणुकीतही भाजप-शिवसेना आघाडी प्रचंड बहुमताने विजयी होणार असून आगामी सरकार या आघाडीचेच असेल, असा दावा भारतीय जनता पक्षाने केला आहे.
पक्षाचे प्रवक्ते सय्यद शाहनवाज हुसेन यांनी केंद्रात भाजपाप्रणीत रालोआचे सरकार स्थापन झाल्यानंतर प्रथमच माध्यमांशी बोलताना उपरोक्त विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, सध्या महाराष्ट्र सरकारजवळ संख्याबळ असले तरी जनमत त्यांच्यासोबत नाही. मुख्यमंत्री बदलला किंवा नाही बदलला तरी त्याचा जनमतावर कुठलाही परिणाम होणार नाही.
राज्यात सरकार आले तर मुख्यमंत्री कोण असेल? भाजपाचा की शिवसेनेचा? असा प्रश्न विचारला असता शाहनवाज यांनी सांगितले की, दोन्ही पक्ष तसेच लोकसभेत सोबत आलेले इतर पक्ष विधानसभा निवडणूकही मिळून लढवतील आणि नवीन मुख्यमंत्री हा भाजप-सेना आघाडीचाच राहील. नंतर अनौपचारिक चर्चेत मात्र केंद्रात ज्या पद्धतीने प्रथम पक्षात आणि नंतर रालोआत नेता निवडण्यात आला त्याच पद्धतीने महाराष्ट्रातही मित्र पक्षांच्या बैठकीत नेत्याची निवड केली जाईल, असे शाहनवाज यांनी स्पष्ट केले. अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात भाजपा प्रवक्ते म्हणाले की, दिल्लीत आम आदमी पार्टी किंवा काँग्रेसच्या आमदारांचा घोडेबाजार करून सरकार स्थापन्याच्या खेळीत त्यांचा पक्ष सहभागी होणार नाही. परंतु दुस:या पक्षाचे आमदार स्वेच्छेने आमच्या सोबत आले आणि सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला तर मात्र भाजपा आपली संवैधानिक जबाबदारी पार पाडण्यास मागेपुढे बघणार नाही.
केंद्रात राज्यमंत्री असलेले आणि सध्या बलात्काराच्या आरोपामुळे वादाच्या भोव:यात अडकलेले निहालचंद मेघवाल यांचा त्यांनी बचाव केला. ज्या प्रकरणात त्यांना आरोपी सांगण्यात येत आहे त्याच्या पहिल्या आणि दुस:या प्राथमिकीत मेघवाल यांचे नाव नव्हते. या आधारे त्यांच्याविरुद्धचे प्रकरण बंद करण्यात आले होते; परंतु मंत्री होताच ते पुन्हा उचलून धरण्यात आले.
याचा अर्थ स्पष्ट आहे. हे एक राजकीय कारस्थान आहे,असे मत त्यांनी व्यक्त केले.