सहकार खात्यातील लिपिकाविरोधात अदखलपात्र गुन्हा
By admin | Updated: September 22, 2016 01:16 IST
औरंगाबाद : येथील सहकार निबंधक कार्यालयातून सिल्लोड येथे बदली झाल्यानंतर कार्यालयात येऊन तेथील कर्मचार्यास धमकावून शिवीगाळ केल्याप्रकरणी प्रमुख लिपिकाविरोधात क्रांतीचौक ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.
सहकार खात्यातील लिपिकाविरोधात अदखलपात्र गुन्हा
औरंगाबाद : येथील सहकार निबंधक कार्यालयातून सिल्लोड येथे बदली झाल्यानंतर कार्यालयात येऊन तेथील कर्मचार्यास धमकावून शिवीगाळ केल्याप्रकरणी प्रमुख लिपिकाविरोधात क्रांतीचौक ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.सचिन गुप्ता असे आरोपी प्रमुख लिपिकाचे नाव आहे. गुप्ता यांची बदली सिल्लोड येथे झालेली आहे. शहरातील परवानाधारक सावकारांच्या नूतनीकरणासाठीचे अर्ज सहकार निबंधक कार्यालयास प्राप्त होतात. या अर्जानुसार संबंधित सावकारांच्या घरी जाऊन त्यांच्या व्यवहाराची तपासणी केल्यानंतर परवाना नूतनीकरण करण्यात येतो. प्रमुख लिपिक गुप्ता यांची बदली झाल्यापासून येथील कार्यालयातील सावकारी शाखेचे प्रमुख म्हणून कनिष्ठ लिपिक प्रमोद सावित्रे काम पाहतात. ते बुधवारी दुपारी कार्यालयीन कामकाज करीत असताना गुप्ता तेथे आले. यावेळी त्यांनी मोबाईलमध्ये शूटिंग करण्यास सुरुवात केली. तुम्ही माझी तक्रार वरिष्ठांकडे का केली, असे विचारत त्यांनी तुम्हाला आणि तुमच्या साहेबांना खपवतो, कार्यालयाबाहेर या, असे म्हणून धमकावण्यास सुरुवात केली. यावेळी तेथील अधिकार्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला त्यांनाही त्यांनी धमकी दिल्याचे म्हटले आहे. याबाबत प्रमोद सावित्रे आणि कर्मचार्यांनी उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर मंगेश सुरवसे यांनी दिलेल्या तक्रारीवरून क्र ांतीचौक ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.