Umar Khalid News: जेएनयूचा माजी विद्यार्थी आणि दिल्ली दंगल प्रकरणी अटकेत असलेला उमर खालीद याला न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. शहादरा जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश समीर वाजपेयी यांनी सात दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला. जामीन देताना न्यायालयाने काही अटीही घातल्या आहेत.
२३ आणि २५ फेब्रुवारी रोजी झालेल्या दिल्ली दंगल प्रकरणी उमद खालीद याला अटक करण्यात आलेली आहे. दिल्लीत पूर्व नियोजित कट करून दंगल भडकावल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. उमर खालीद २८ फेब्रुवारी रोजी बाहेर येणार असून, ३ जानेवारी रोजी सायंकाळपर्यंत तुरुगांबाहेर असणार आहे. २० हजारांच्या जातमुचल्यावर न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला.
उमर खालीदला जामीन मिळण्याचे कारण काय?
उमर खालीदने शहादरा जिल्हा न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज केला होता. बहिणीचे लग्न असून, त्यासाठी जामीन देण्याची विनंती उमरने केली होती. उमर खालीदच्या बहिणीचे १ जानेवारी रोजी लग्न आहे. ३० आणि ३१ डिसेंबरला हळद, मेहंदी कार्यक्रम होणार आहे, असे खालीदने याचिकेत म्हटलेले आहे.
कुटुंबियांना आणि नातेवाईकांना भेटायचे असल्याचे, तसेच अमेरिकेतूनही बहिणी येणार आहे, तिलाही भेटायचे असल्याचा उल्लेख खालीदने याचिकेत केलेला होता. बहिणीचे रिसेप्शन नागपूर येथे होणार असून, नागपूर न जाता दिल्लीतच थांबणार असल्याचे उमरने याचिकेत म्हटले होते. त्यामुळे न्यायालयाने ७ दिवसांचा जामीन मंजूर केला.
न्यायालयाने कोणत्या अटी घातल्या?
उमर खालीदला जामीन देताना न्यायालयाने काही अटीही घातल्या आहेत. उमर खालीद फक्त कुटुंबातील व्यक्ती, नातेवाईक आणि मित्रांनाच भेटू शकतो. त्याने घरीच राहावे किंवा जिथे लग्न समारंभ आहे, तिथे तो जाऊ शकतो. या काळात उमर खालीदने सोशल मीडियाचा वापर करू नये, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.