नवी दिल्ली : एका टॅक्सीचालकाने शुक्रवारच्या रात्री एका २७ वर्षीय महिलेवर आपल्या कारमध्ये बलात्कार केल्याची घटना दिल्लीच्या इंद्रलोक भागात घडली आहे. पोलिसांनी या टॅक्सीचालकाला रविवारी मथुरा येथे अटक केली.आरोपी शिवकुमार यादव (३२) हा एका आंतरराष्ट्रीय कॅब बुकिंग सर्व्हिस उबेरचा टॅक्सीचालक आहे. तो उत्तर प्रदेशच्या मथुरा येथील रहिवासी आहे. त्याची टॅक्सीही पोलिसांनी जप्त केली. पीडित महिला गुडगाव येथील एका फायनान्स कंपनीत कामाला आहे. ती शुक्रवारी रात्री आरोपीच्या टॅक्सीत बसून आपल्या इंद्रलोक येथील घरी परत जात होती. शिवकुमार याने टॅक्सी एका निर्जन स्थळी थांबविली व टॅक्सीचे दार व खिडक्या लॉक केल्या. त्यानंतर त्याने प्रवासी महिलेवर बलात्कार केला. बलात्कार केल्यावर त्याने ही बाब कुणालाही न सांगण्याची धमकी महिलेला दिली व तिला सोडून तो पसार झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
दिल्लीत ‘उबेर’च्या टॅक्सीचालकाचा महिलेवर बलात्कार
By admin | Updated: December 8, 2014 01:52 IST