नवी दिल्ली : देशातील जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून केंद्रात सत्तेत आलेल्या भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी अच्छे दिन यायला आणखी २५ वर्षे लागतील असे सांगून घूमजाव केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. विरोधी पक्षाने भाजपावर जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप केला तर भाजपाने बचावात्मक पवित्रा घेत शहा यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा केला आहे. या निमित्ताने निवडणूक प्रचारातील बत्तिशी आता वचनपूर्तीच्या बाबतीत पंचविशीकडे झुकल्याची जाणीव झाली आहे.केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी मंगळवारी येथे विशेष पत्रपरिषदेत शहा यांच्या सोमवारच्या भाषणाची क्लिपिंगच दाखविली. हे भाषण भोपाळमधील पक्षाच्या बैठकीत देण्यात आले होते. शहा यांनी अच्छे दिनसंदर्भात २५ वर्षांचा उल्लेख केला नव्हता, हे त्यांना स्पष्ट करायचे होते. शहा यांचे भाषण खळबळजनक बनविण्यासाठीच त्यांचे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आले असा आरोप भाजपाने केला. दुसरीकडे विरोधी पक्षांनीही या मुद्यावरून भाजपाला लगेच लक्ष्य केले. विश्वासघात आणि खोटी स्वप्ने दाखविणाऱ्या भाजपाला या देशातील जनता नक्कीच धडा शिकवेल, असा दावा काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना केला. खोट्या आश्वासनांची त्सुनामी आणून भाजपाने धोका दिल्याचा त्यांचा आरोप होता. ‘शहा यांचे अच्छे दिन आले आहेत. त्यामुळे जनतेचे काहीही होवो, आता त्यांनी मजा केली पाहिजे’, अशी उपरोधिक टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंग यांनी टिष्ट्वटरवर केली.(लोकमत न्यूज नेटवर्क)काय म्हणाले होते शहा?देशात पुन्हा इंग्रज राजवटीपूर्वीचा काळ आणणे हेच खरे अच्छे दिनचे द्योतक आणि आश्वासन आहे. येत्या पाच वर्षात महागाई, परराष्ट्र संबंध, सुरक्षा, रोजगार आदी आघाड्यांवर भाजपा योग्य सुधारणा करेल. परंतु जागतिक स्तरावर भारताला सर्वोच्च स्थानी न्यायचे असल्यास २५ वर्षे हवीत, असे शहा भोपाळमध्ये म्हणाले होते.
‘अच्छे दिन’ येण्यास निदान पंचवीस वर्षे !
By admin | Updated: July 15, 2015 00:06 IST