येथे मुख्यमंत्री पिनारायी विजयन बसलेले आहेत. हे तर इंडिया आघाडीचे एक मजबूत आधारस्तंभ आहेत. शशी थरूर बसले आहेत. आजचा हा कार्यक्रम अनेकांची झोप उडवेल. जेथे मेसेज जायला हवा होता. तेथे पोहोचला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्यांनी शुक्रवारी केरळ येथे विझिनजाम आंतरराष्ट्रीय बंदराचे उद्घाटन केले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात गौतम अदाणी यांच्या नावाचाही उल्लेख केला.
मी आद्य शंकराचार्यांना अभिवादन करतो -मोदी म्हणाले, "आज भगवान आदि शंकराचार्य यांची जयंती आहे. तीन वर्षांपूर्वी सप्टेंबर महिन्यात मला त्यांच्या जन्मभूमीत जाण्याचे भाग्य लाभले. आद्य शंकराचार्य यांनी केरळ सोडून देशाच्या विविध कानाकोपऱ्यात मठ स्थापन करून राष्ट्राची चेतना जागृत केली. मी त्यांना अभिवादन करतो."
पंतप्रधान मोदींच्या भाषणात गौतम अदाणींचा उल्लेख -पंतप्रधान मोदींनी नाव न घेता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. गौतम अदाणी यांच्या उल्लेख करत ते म्हणाले, "येथे गौतम अदानीही उपस्थित होते. अदाणी यांनी जेवढे चांगले बंदर येथे तयार केले आहे, तेवढे चांगले बंदर तर गुजरातमध्येही तयार केलेले नाही."
विझिनजाम बंदरासाठी लागले 8800 कोटी - विझिनजाम बंदर बांदण्यासाठी जवळफास 8800 कोटी रुपये एवढा खर्च आला आहे. याची ट्रान्सशिपमेंट हब क्षमता येणाऱ्या काळात तीन पट असेल. हे बंदर कार्गो जहाजांना डोळ्यासमोर ठेऊन तयार करण्यात आले आहे.