तिरुपती देवस्थान समितीने मंदिरातील काही कर्मचाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. धार्मिक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल १८ कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. या कर्मचाऱ्यांवर हिंदू परंपरांचे पालन न करण्याचा आरोप आहे. याबाबत बोर्डाने याआधीच स्पष्टीकरण दिले होते. देवस्थानममध्ये फक्त हिंदू कर्मचारीच काम करू शकतात. पण चौकशीदरम्यान, हे १८ कर्मचारी गैर-हिंदू परंपरांचे पालन करत असल्याचे आढळून आले, यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
'जर मला काही झाले तर इराण पृथ्वीवर दिसणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
टीटीडीच्या प्रस्तावानुसार,या कर्मचाऱ्यांना तिरुमला मंदिरे आणि त्यांच्या संबंधित विभागांमधून काढून टाकले जाणार आहे. तसेच, त्यांना कोणत्याही हिंदू धार्मिक कार्यक्रमात किंवा विधीत सहभागी होण्याची परवानगी दिली जाणार नाही. बोर्डाने या कर्मचाऱ्यांना दोन पर्याय दिले आहेत. यामध्ये एकतर त्यांनी सरकारी विभागात बदलीसाठी अर्ज करावा किंवा स्वेच्छा निवृत्ती योजनेअंतर्गत संस्थेतून निवृत्त व्हावे. जर त्यांनी यापैकी कोणताही पर्याय स्वीकारला नाही तर त्यांच्यावर अधिक कठोर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
टीटीडीने दिलेल्या माहितीनुसार, "टीटीडीचे अध्यक्ष बीआर नायडू यांच्या निर्देशानुसार, टीटीडीमध्ये नोकरी करताना गैर-हिंदू धार्मिक कार्यात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी अशा १८ कर्मचाऱ्यांची ओळख पटवली आहे, यामध्ये हिंदू परंपरांचे पालन करण्याऐवजी इतर धर्मांशी संबंधित कार्यात सहभागी असल्याचे समोर आले आहे.अशा कर्मचाऱ्यांना मंदिरे आणि धार्मिक कार्यक्रमांमधून काढून टाकले जाईल आणि त्यांना बदली किंवा व्हीआरएसचा पर्याय देण्यात आला आहे. टीटीडीचे धार्मिक महत्त्व आणि मंदिरांचे आध्यात्मिक पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असंही सांगण्यात आले आहे.
कोणतीही तडजोड केली जाणार नाही
टीटीडी बोर्डाच्या मते, १९८९ च्या एंडोमेंट कायद्यानुसार सर्व टीटीडी कर्मचाऱ्यांना हिंदू परंपरांचे पालन करणे बंधनकारक आहे. मंडळाने म्हटले आहे की, हे प्रकरण मंदिराच्या पावित्र्याशी आणि भाविकांच्या धार्मिक भावनांशी संबंधित आहे. टीटीडीचे अध्यक्ष बीआर नायडू यांनी आधीच स्पष्ट केले होते की, तिरुमला हिंदू श्रद्धेचे केंद्र म्हणून ठेवणे ही त्यांची प्राथमिकता आहे. देवस्थानमच्या परंपरांचा आदर करण्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.
टीटीडी बोर्डाचे सदस्य आणि भाजप नेते भानू प्रकाश रेड्डी यांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे. ते म्हणाले की, हिंदू धार्मिक स्थळांचे पावित्र्य राखण्यासाठी हे एक आवश्यक पाऊल आहे. "जर गरज पडली तर आम्ही सर्व बिगर हिंदू कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यास तयार आहोत." या निर्णयानंतर तिरुपती मंदिर प्रशासनात कडक कारवाई वाढण्याची शक्यता आहे.