मध्य प्रदेशातील टिकमगढ जिल्हा रुग्णालयात रुग्णाच्या उपचारादरम्यान झालेल्या निष्काळजीपणाचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा बेडवर त्याच्या वडिलांला लावलेली सलाईनची ब़ॉटल हातात धरून उभा असल्याचं दिसत आहे, कारण रुग्णालयात सलाईन लावण्यासाठी स्टँडही उपलब्ध नव्हता. या घटनेमुळे रुग्णालयाची दयनीय अवस्था आणि कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा उघड झाला आहे.
सुंदरपूर गावातील रहिवासी पप्पू अहिरवार यांची प्रकृती बिघडल्याने जिल्हा रुग्णालयाच्या सर्जिकल वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान नर्सने पप्पू यांना सलाईनची बॉटल दिली, पण बॉटल लावण्यासाठी स्टँड नसल्याने, त्यांच्या छोट्या मुलाला बॉटल हातात धरून बेडवर उभं राहायला लावलं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनात खळबळ उडाली. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने रुग्ण कल्याण समितीची बैठक बोलावली आणि रुग्णालयाला भेट दिली. चौकशीनंतर, सर्जिकल वॉर्डमध्ये ड्युटीवर असलेले वॉर्ड बॉय महेश वंशकार याला निलंबित करण्यात आलं.यासोबतच कर्तव्यावर उपस्थित असलेल्या तीन स्टाफ नर्सना नोटीस बजावण्यात आली आहे आणि उत्तर मागितलं आहे.
जिल्हा रुग्णालयाचे सहाय्यक व्यवस्थापक डॉ. अंकुर साहू यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हाधिकारी आणि सिव्हिल सर्जन यांच्या निर्देशानुसार तात्काळ कारवाई करण्यात आली. वॉर्ड बॉय महेश वंशकार याला निलंबित करण्यात आलं आहे आणि विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. तीन स्टाफ नर्सना नोटीस बजावण्यात आली आहे आणि कर्मचाऱ्यांना भविष्यात अशा प्रकारची निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही असं सांगण्यात आलं आहे.